नवी दिल्ली- अमेरिकेच्या डेलावेअर सुप्रीम कोर्टाने १.५ अब्ज डॉलरचे कर्ज मुदतीत न फेडल्याबद्दल बायजूला दोषी ठरवले आहे.त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बायजू या एडटेक कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. डेलावेअर सुप्रीम कोर्टाने बायजूला कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना अमेरिकेतील कंपनीच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यास मान्यता दिली आहे.
या वित्तीय संस्थांनी आता या कंपनीची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टिमोथी पोहल यांची बायजू अल्फा इंक या कंपनीचे एकमेव संचालक म्हणुन नियुक्ती केली आहे. कोर्टाने संपूर्ण परतफेड करण्याची मागणी करण्यास संमती दिली आहे.मुदत कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने म्हटले आहे की, बायजूने जाणीवपूर्वक कर्ज कराराचे उल्लंघन केले आहे.बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन आणि त्यांचा भाऊ रिजू रवींद्रन यांनी स्वतः कबूल केले आहे की, बायजूने ऑक्टोबर २०२२ पर्यंत कर्ज भरण्यास विलंब केला होता.आम्हाला आनंद आहे की डेलावेअरच्या सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आधीच माहित असलेल्या गोष्टीची निर्णायक पुष्टी केली आहे. बायजूने जाणूनबुजून कर्ज कराराचे उल्लंघन केले आहे.