वॉशिंग्टन
अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पत्नी रोझलिन कार्टर यांचे काल निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या स्मृतीभ्रंशाने ग्रस्त होत्या. जॉर्जियातील प्लेन्स येथे त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनावर जिमी कार्टर यांनी म्हटले की, मी जे काही साध्य केले त्यात रोझलिन यांचा मोठी वाटा होता.
रोझलिन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२७ रोजी प्लेन्स या छोट्या गावात झाला. त्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी आईसोबत कपडे शिवण्याचे काम केले. १९४५ मध्ये अमेरिकी नौदलातून रजेवर आलेल्या जिमी कार्टर यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर १९४६ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. रोझलिन यांनी १९७७ ते १९८१ (जिमी हे राष्ट्राध्यक्ष असताना) या काळात व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जगभरातील मानवी हक्क, लोकशाही आणि मानसिक आरोग्य या विषयांवर आवाज उठवला.