अमेरिकेच्या झॅक स्वोपचा एका वर्षात ७७७ सिनेमे पहाण्याचा विश्वविक्रम

वॉशिंग्टन : अमेरिकेतील झॅक स्वोप याने एका वर्षात ७७७ चित्रपट पाहाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. जुलैपर्यंतच्या एका वर्षात त्याने सिनेमागृहामध्ये जाऊन ७७७ चित्रपट पाहिले. झॅच स्वोप अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील रहिवासी असून त्याने ‘मिनिअन्स: राइज ऑफ ग्रू’ या चित्रपटाने विक्रमाची सुरुवात केली आणि ‘इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी’ या चित्रपटाने समाप्ती केली.

झॅक स्वोपच्या चित्रपट पाहण्याच्या विक्रमाला आता रीतसर मान्यता देण्यात आली. यापूर्वी एकाच वर्षात चित्रपट पाहण्याचा मागील विश्वविक्रम फ्रान्सच्या व्हिन्सेंट क्रोन्हच्या खात्यावर होता. व्हिन्सेंटने २०१८ मध्ये एकाच वर्षात ७१५ चित्रपट पाहिले होते. ३२ वर्षीय झॅकला चित्रपट पाहण्याचे वेड असून यापूर्वीही त्याने दरवर्षी किमान १०० ते १५० चित्रपट पाहिले आहेत. जुलैपर्यंतच्या वर्षभरात त्याने वैविध्यपूर्ण चित्रपट पाहण्यास पसंती दिली. त्याने मिनियन्स राईज ऑफ ग्रू या चित्रपटाने आपल्या विश्वविक्रमाचा श्रीगणेशा केला आणि इंडियन जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी या चित्रपटाने विश्वविक्रमाची सांगता केली. विशेष म्हणजे, झॅकने चित्रपट पूर्णपणे पहिला आहे, याची खातरजमा करण्यासाठी गिनीज रेकॊर्ड्सचे प्रतिनिधी वर्षभर त्याच्यासोबत असायचे. चित्रपट पाहताना झॅकला तेथे डुलकी घेण्याची किंवा अगदी आपला फोन पाहण्याचीही परवानगी नव्हती. इतकेच नव्हे तर चित्रपट पाहताना त्याला काहीही खाण्या-पिण्याचीही परवानगी नव्हती. त्याने एका दिवसात जास्तीत जास्त ३ चित्रपट पाहिले. चित्रपट पाहण्यासाठी त्याने अनलिमिटेड मेंबरशिपचा वापर केला होता. त्याचा चित्रपट पाहण्याचा महिन्याचा खर्च २२ डॉलर्सच्या आसपास होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top