*डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध बायडेन सामन्याची शक्यता
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे पुढील वर्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पुन्हा एकदा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ते उमेदवारी जाहीर करतील, असे सांगितले जाते. येत्या मंगळवारी व्हिडिओद्वारे बायडेन त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. या वेळीही त्यांनाच उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासमोर डोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.
ज्यो बायडेन हे ८० वर्षांचे आहेत. २०२० मध्ये ते अध्यक्षपदावर निवडून आले होते, तेव्हाच ते अमेरिकेचे सर्वाधिक वय असलेले अध्यक्ष ठरले होते. आणखी चार वर्षे देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे. सध्या तरी बायडेन यांना त्यांच्या पक्षातून उमेदवारीसाठी कोणतेही आव्हान नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेल्या निवडणुकीदरम्यान, कोरोना संकटापासून देशाला वाचविण्यासाठी आणि तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी बायडेन हेच योग्य उमेदवार असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना वाटले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासमोर ट्रम्प यांचे आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जाते. बायडेन यांनी गेल्या काही महिन्यांत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रबळ दावेदार असतानाही रेडिओवरील प्रसिद्ध निवेदक लॅरी एल्डर यांनी या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. एल्डर यांनी २०२१ मध्ये कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरविरोधात मोहिम राबविली होती. अमेरिकेची घसरण होत असून ती रोखणे शक्य आहे. आपण पुन्हा सुवर्णयुगात प्रवेश करू शकतो, मात्र त्यासाठी योग्य नेत्याची निवड आवश्यक आहे. त्यामुळेच मी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे, असे ट्विट एल्डर यांनी केले होते.