अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वत: आले मोदींशी गळाभेट! व्हिडिओ व्हायरल

हिरोशिमा – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-7 शिखर परिषदेसाठी जपानमध्ये दाखल झाले. या परिषदेच्या आजच्या एका सत्रावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे स्वत:हून चालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आले आणि त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. बलाढ्य अमेरिकेचे प्रमुख मोदींना भेटायला पुढे येतात याचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.
जपान, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटाली, कॅनडा व इतर देशांचे प्रतिनिधी जी-7 बैठकीसाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. संरक्षण, आण्विक नि:शस्त्रीकरण, हवामान, तंत्रज्ञान, आरोग्य आदी विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्या बरोबरही पंतप्रधान मोदींची बैठक झाली. पंतप्रधान मोदी यांनी हिरोशिमा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करून तेथील भारतीयांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोेदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही देशांतील व्यापारात वाढ करणे, स्वच्छ उर्जा निर्मिती, लसींचे उत्पादन, युक्रेन युद्धामुळे होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणे या विषयी दोघांमध्ये चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यातही बैठक झाली. ग्लोबल साऊथ समोरील मुद्दे, पर्यटन, कौशल्य विकास, सेमी कंडक्टर, डिजिटल सुविधा, हरित हायड्रोजन या क्षेत्रांत परस्पर सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान मोदी हे जपाननंतर पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया अशा सहा दिवसांच्या दौर्‍यावर आहेत.
हिंद-प्रशांत द्विप सहकार्य मंचच्या तिसर्‍या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीला जाणार आहेत. या मंचाचे यजमानपद पंतप्रधान मोदी आणि पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्याकडे आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सिडनी येथे जातील. तिथे त्यांची पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी बैठक होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top