अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे काल जॉर्जियाच्या प्लेन्स गावात त्यांच्या राहत्या घरी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांच्या पत्नी रोझलिनचाही याच घरात मृत्यू झाला होता. कार्टर दीर्घकाळापासून मेलानोमा या त्वचेच्या कर्करोगाने त्रस्त होते. ते व्यापारी, नौदल अधिकारी, राजकारणी, वार्ताहर आणि लेखक होते. कार्टर यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून आर. फोर्ड यांचा पराभव करून, १९७७ ते १९८१ या कालावधीत अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्षपद भूषवले होते. जॉर्जियात १ ऑक्टोबर १९२४ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर १९७१ ते १९७५ या काळात ते जॉर्जियाचे गव्हर्नरही होते. तसेच, २००२ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकाने गौरवले होते.

या काळात त्यांनी अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील संबंधांचा पाया घातला. २०१६ मध्ये कार्टर यांना मेलानोमा हा चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोग होऊनही ते मानवतावादी कार्यात व्यस्त होते. अध्यक्षपद सोडल्यानंतर वर्षभरात त्यांनी ‘कार्टर सेंटर’ नावाची धर्मादाय संस्था स्थापन केली. या अंतर्गत निवडणुकीत पारदर्शकता आणणे, मानवी हक्कांचे समर्थन करणे, आरोग्य सेवा बळकट करण्यात या धर्मादाय संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “हा एक दुःखाचा दिवस आहे. कार्टर एक राजकारणी आणि मानवतावादी नेते होते. अमेरिकेने आणि जगाने एक उल्लेखनीय नेता, तर मी एक मित्र गमावला. गेली अनेक वर्षे, सुमारे ५० हून अधिक काळ त्यांच्याशी असंख्य विषयांवर संवाद झाला. त्यांनी नागरी हक्क, मानवाधिकार प्रगत केले आणि जगभरातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांना प्रोत्साहन दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top