नवी दिल्ली- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन आणि जर्मनीचे संरक्षण फेडरल मंत्री बोरीस पिस्टोरियस भारत दौऱ्यावर येणार आहेत. राजनाथ सिंग ५ जून रोजी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार आहेत तर, जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांशी ते ६ जून रोजी चर्चा करणार आहेत. ही भेट नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
संरक्षण विषयक द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. यात औद्योगिक सहकार्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. अमेरिकन संरक्षणमंत्री दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी ते मार्च २०२१ मध्ये भारतात आले होते. जर्मन संघराज्याचे संरक्षण मंत्री चार दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. इंडोनेशियातून ते भारतात येतील. ७ जूनरोजी ते मुंबईला भेट देणार असून पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयालाही तसेच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडलाही भेट देण्याची शक्यता आहे.