न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशांतर्गत धोरण सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची नियुक्ती केली आहे. त्या विद्यमान सल्लागार सुसान राइस यांची जागा घेतील. या निर्णयानंतर नीरा टंडन या व्हाईट हाऊसच्या सल्लागार समितीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी असतील.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, ‘नीरा टंडन यांचे ज्ञान, चिकाटी आणि राजकीय बाबींवर असलेल्या अभ्यासाचा देशाला फायदा होईल.’ नीरा टंडन यांनी आतापर्यंत अमेरिकेतील तीन राष्ट्रपतीबरोबर काम केले आहे. तसेच डाव्या विचारसरणीची थिंकटँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली आहे. त्यांना हिलरी क्लिंटन यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते.