अमृतसर – अमृतसर मध्ये काल सकाळी एका अनिवासी भारतीयावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. त्याला मारु नका अशी विनवणी करणारा त्यांच्या कुटुंबियाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलाच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे. हा हल्ला दोन कुटुंबियांच्या वादातून झाल्याचे पंजाबच्या पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
अमृतसरच्या दबुर्जी भागातील एका घरात दोन हल्लेखोरांनी सकाळी सात वाजता सुखचैन सिंह यांच्या घरात प्रवेश केला. हल्लेखोर व सुखचैन यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी सुखचैनवर तीन गोळ्या झाडल्या. यावेळी सुखचैनचे कुटुंबियांनी हल्लेखोरांना गोळी न झाडण्याची हात जोडून विनंती करत होते. तरीही त्यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर सुखचैन सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या संदर्भात पोलीस आयुक्त ढिल्लो यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत राहात असलेल्या दोन कुटुंबियांमध्ये सुरु असलेल्या वादामुळे हा हल्ला घडवण्यात आला. अमेरिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाने सुखचैनवर हल्ला करण्यासाठी अमृतसर मधील हल्लेखोरांना सुपारी दिली होती. अमेरिकेतून यासाठी पाठवलेल्या पैशांच्या व्यवहाराचीही चौकशी करण्यात येत असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.