बेंगळुरू : नंदिनी विरुद्ध अमूल या कर्नाटकात सुरू असलेल्या वादात राहुल गांधींची एन्ट्री झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी नंदिनी मिल्क पार्लरमध्ये पोहोचले. तिथून त्यांनी एक आईस्क्रीम विकत घेतले आणि हा ब्रँड कर्नाटकची शान असल्याचे म्हटले आहे. यांनतर राहुल गांधींनी त्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आणि लिहिले, “कर्नाटकचा अभिमान – नंदिनी बेस्ट आहे!”
कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी बेंगळुरूच्या जेपी नगर येथील नंदिनी मिल्क पार्लरमध्ये काही वेळ घालवला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल होते. यावेळी राहुल यांनी कर्नाटक दूध महासंघाचा मुख्य ब्रँड नंदिनीला त्यांनी सर्वोत्कृष्ट म्हणून संबोधले. दरम्यान, अमूलने बेंगळुरूला दूधपुरवठा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर यावरून वाद सुरू झाला होता. यावर काँग्रेस आणि जेडी(एस) यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की, भाजपला कर्नाटकात अमूल आणून नंदिनीला संपवायचे आहे. त्यामुळे नंदिनी उत्पादनांचा तुटवडा निर्माण होईल. मात्र, बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने हा आरोप फेटाळून लावला. अमूलकडून नंदिनीला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, अमूल ब्रँडबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आम्ही नंदिनी ब्रँडला देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आणखी स्पर्धात्मक बनवू. विरोधक या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत.