मुंबई
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे 'चाणक्य' अमित शहा 15 एप्रिल रोजी संध्याकाळी मुंबईत येऊन पक्षाच्या नेत्यांचा क्लास घेणार आहेत.त्यामुळे मुंबई भाजपा चे नेते जोरदार तयारीला लागले आहेत..त्यांचा मुंबई दौरा पाहता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर, नागपूर आणि पुण्यानंतर आता शहा यांचा एकदिवसीय मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. हा कार्यक्रम नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते 15 एप्रिलला संध्याकाळीच मुंबईला पोहोचणार आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ते पक्षाच्या निवडक ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत..शहा हे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती घेणार आहेत. बाबरी प्रकरणातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमित शहा संतापले आहेत. शहा सह्याद्रीच्या बैठकीत पाटील यांचाही क्लास घेऊ शकतात, असे मानले जात आहे. याशिवाय ते शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीचाही आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. केंद्रीय मंत्री शहा यांना मुंबई महापालिकेवर भाजपचे नियंत्रण हवे आहे. त्यामुळेच त्यांच्या मुंबईतील आगमनाचा संबंध महापालिका निवडणुकीशी जोडला जात आहे.