मुंबई – जम्मू आणि काश्मीरमध्ये एका पाठोपाठ एक दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मात्र देशाचे गृहमंत्री हात चोळत बसले आहेत, अशी घणाघाती टीका करीत शहा हे देशाला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत,असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. दहशतवादी हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत दहशतवादी हल्ल्यांत चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. खरेतर केंद्र सरकार आणि गृहमंत्र्यांच्या बेपर्वाईमुळे या जवानांची हत्या झाली आहे. दहशतवादी थैमान घालत असताना अमित शहा हात चोळत बसले आहेत. शहा-मोदी राजकीय विरोधकांना आपले शत्रू मानतात. विरोधकांना संपविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावतात. अमित शहा फोडाफोडीचे राजकारण करण्यात, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्यात आणि रोखे गोळा करण्यात व्यग्र आहेत. त्यांनी एवढी ताकद जर देशाच्या शत्रूंचा खात्मा करण्यासाठी वापरली असती तर जवानांचे बळी जाण्याचे दुर्दैवी दृश्य आज दिसले नसते,अशा शब्दांत राऊत यांनी केंद्र सरकार आणि अमित शहा यांचा समाचार घेतला.
राऊत यांनी याप्रसंगी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्ला चढवला. सर्व भ्रष्टाचऱ्यांना सोबत घेऊन वाट्टेल त्या थराला जात सत्ता हस्तगत करण्याच्या हडेलहप्पी वृत्तीमुळे भाजपा आणि संघ बदनाम होत आहे,अशी बोचरी टीका राऊत यांनी केली