नाशिक- शरद पवार हे 10 वर्षे देशाचे कृषीमंत्री होते. सहकार खातेही त्यांच्याच ताब्यात होते. मात्र या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नाशिक मध्ये केला. ते वेंकटेश्वरा सहकारी संस्थेने आयोजित केलेल्या सहकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात बोलल्याने फटका बसल्यानंतर त्यांच्या विरोधात बोलू नका अशी विनंती अजित पवार यांनी केली होती. राजकीय हित पाहून विधानसभा निवडणुकीत मोदी व शहा यांनी ही विनंती पाळली. मात्र विधानसभा निवडणूक होताच अमित शहा यांनी पुन्हा हल्लाबोल सुरू केला आहे. आज त्यांनी जी टीका केली तीच 2019 साली मोदी व शहा यांनी बारामतीत येऊन केली होती. तेव्हा चाचा भतिजा चोर है , त्यांना हद्दपार करा, असा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने ‘भतिजा’ ला सरकारसोबत घेतले .
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आज नाशिक व मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा झाली. त्यानंतर त्यांनी वेंकटेश्वरा येथील सहकार परिषदेला संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह छगन भुजबळही मंचावर उपस्थित होते. विशेष म्हणजे भुजबळ यांनी शहा यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाही. पक्षाचे चिन्ह घड्याळही नव्हते.
आपल्या भाषणात अमित शहा शरद पवारांवर टीका करीत पुढे म्हणाले की, केवळ मार्केटिंग करून नेता होता येत नाही. त्यासाठी उभे राहून काम करावे लागते. सर्वांना बरोबर घेऊन तळागाळातील लोकांसह काम करावे लागते. लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला. मोदींनी त्याला ‘जय विज्ञान’ अशी जोड दिली. मोदी यांच्या कल्पनेनेच देशात पहिल्यांदा माती परीक्षण सुरू झाले. त्याआधी जमिनीत काय आहे याची कल्पना शेतकऱ्यांना नव्हती. मोदींनी माती परीक्षण
सुरु केल्यानंतर जमिनीत सल्फर टाकायचे की नाही. त्यात खत कोणते मिसळायचे हे शेतकऱ्यांना कळू लागले व त्यातून शेतीचे उत्पन्न वाढले. मोदींनी देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी विविध योजना आणल्या. इथेनॉल प्रकल्पाला मंजुरी दिली. देशात संगणकीकरण केले. साखर कारखान्यातील आयकराचा प्रश्न सोडवला. त्यामुळे आता सहकार क्षेत्र एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. देशातील शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी मोदींनी शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या.
यावेळी त्यांनी वेंकटेश्वराने केलेल्या कामाचा गौरव केला. ते म्हणाले की, या ठिकाणी वेंगटेश्वराने शेतकऱ्यांसाठी एकाच जागी अनेक सोयी उपलब्ध केल्या. दीड हजार गीर गाई पाळल्या असून त्यांच्या मलमुत्राच्य सहाय्याने सेंद्रीय शेती केली जात आहे. वेंकटेश्वराने एकाच जागी शेतकऱ्यांसाठी विविध सेवा प्रदान केल्या आहेत. आता त्यांनी अत्याधुनिक अशी मृदा प्रयोगशाळाही स्थापन केली .
अमित शहा – भुजबळ जवळीक
अमित शहा यांच्या नाशिक दौऱ्यात छगन भुजबळ त्यांच्या बरोबर होते. व्यासपीठावरही छगन भुजबळ यांच्यासाठी अमित शहा यांच्या शेजारी खुर्ची ठेवण्यात आली होती. अमित शहा यांनी भाषणात मोठ्या आदराने त्यांचे नाव घेतले. त्याआधी अमित शहा यांच्या स्वागतासाठी भुजबळांनी जागोजागी बॅनर लावले होते. या बॅनरवर त्यांनी केवळ त्यांचे व समीर भुजबळाचे फोटो लावले. त्यावर अजित पवार यांचा फोटोही नव्हता त्याचबरोबर त्यावर राष्ट्रवादीचेही नाव व चिन्हही नव्हते.
अमित शहांचा पुन्हा शरद पवारांवर हल्ला सुरू! कृषीमंत्री म्हणून नाकाम
