मुंबई- मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात उबाठाचे महेश सावंत आणि महायुतीच्या शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांच्याशी त्यांचा सामना आहे. मात्र आता अमित ठाकरे यांचा विजय सुकर करण्यासाठी महायुतीने त्यांना पाठिंबा देत सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी चाल भाजपाने खेळली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या मर्जीने महायुतीतच आहेत हे उघड न सांगता मुंबईतील त्यांचे उमेदवार विजयी करण्याची तयारी सुरू आहे. या राजकारणाला ठाकरे कुटुंबावरील प्रेम आणि मैत्रीमुळे हा निर्णय घ्यावा, असा मुलामा चढवित मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिंदेंचा उमेदवार मागे यावा अशी मागणी केली. मात्र, ठाकरे घराण्यातील म्हणून अमित यांना समर्थन देताना ठाकरे कुटुंबाचाच सदस्य असलेल्या आदित्य यांना वरळी मतदारसंघात पराभूत करण्यासाठी महायुती जंग जंग पछाडत आहे. भाजपा आणि महायुतीचा दुटप्पीपणा यातून उघड झाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढणार आहे. मनसेने अनेक मतदारसंघांत आपले उमेदवारही जाहीर केले आहे. त्यात अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात शिंदे सेनेचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. ते सलग दोन वेळा या मतदारसंघातून जिंकले आहेत. त्यांना शिंदे सेनेने पुन्हा उमेदवारी दिली असून, उबाठा गटाचे महेश सावंत तिसऱ्यांदा उमेदवाराच्या रूपाने रिंगणात आहेत. या तिहेरी लढतीमुळे अमित ठाकरे यांच्या विजयाची वाट बिकट झाली आहे. ही लढत राज ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसेने दिलेला पाठिंबा लक्षात ठेवून किमान या मतदारसंघात तरी महायुती अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल का, सदा सरवणकर माघार घेतील का, यापैकी काहीच झाले नाही तर मनसे आणि महायुती मैत्रीपूर्ण लढत होईल का, असे प्रश्न विचारले जात असतानाच आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना पाठिंब्याचे वक्तव्य केले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. महायुतीमध्ये एक नाते आपण जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन (निवडून) देऊ, असे मला वाटते. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल. हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले असतील, तर आपण नाते जपायला हवे. भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल, तरी महायुतीने नाते जपावे.
यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, सदा सरवणकरांनी पडत्या काळामधे शिंदे साहेबांना मदत केली. त्यांना तिकीट देणे चुकीचे नाही. मात्र, राज ठाकरेंचे चिरंजीव तिथून निवडणूक लढवणार असतील तर त्याबद्दल निर्णय ज्येष्ठ नेते घेतील. आशिष शेलार म्हणाले ती कदाचित भाजपाची भूमिका असू शकते. परंतु या संदर्भातील सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे यांचे असतील, ते योग्य वेळी निर्णय घेतील.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षाच्या विविध भूमिका असतात. ही निवडणूक महायुद्धासारखी लढली जाईल. महाराष्ट्रद्रोह्यांना कोण मदत करते हे जनता बघेल. अमित ठाकरे हा आमच्याच घरातला मुलगा आहे. परंतु निवडणुकीत लढावे लागते.
सदा सरवणकरांच्या समर्थकांना त्यांच्या माघारीचा निर्णय मान्य होणे अवघड आहे. कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असे त्यांचे म्हणणे असून, इथून सदा सरवणकर निवडून येणारच असा त्यांना विश्वास आहे. सदा सरवणकर माघार घेणार नाहीत असे त्यांचा पुत्र समाधान सरवणकर यांनी आज पत्रकारांना सांगितले. परंतु 4 नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत सरवणकर यांच्यावर दबाव आणून त्यांना माघार घेण्यास जबरदस्ती होईल.
अमित ठाकरे घरचा म्हणून महायुतीचा पाठिंबा! आदित्यविरोधात ठाकरे असूनही शस्त्र उपसणार
