नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या (सपा) खासदार जया बच्चन यांचे नाव घेताना अमिताभचे नाव लावल्याने राज्यसभेत चांगल्याच संतापल्या. उपसभापतींनी जया बच्चन यांचा उल्लेख ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला.त्यामुळे जया बच्चन संतापल्या. महिलांची ओळख त्यांच्या पतीच्या नावाने कशाला करून देता,असा सवाल त्यांनी उपाध्यक्षांना विचारला.राज्यसभेचे कामकाज सुरू असताना जया बच्चन यांना काही मुद्यांवर बोलायचे होते. तशी परवानगी त्यांनी उपसभापतींकडे मागितली होती.उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांना बोलण्याची परवानगी देताना श्रीमती जया अमिताभ बच्चन यांनी आपला मुद्दा मांडावा,अशी सूचना केली.त्यावर जया तत्काळ उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख केल्याबद्दल आक्षेप घेतला. उपसभापती महोदय आपण केवळ जया बच्चन एवढे म्हटले असते तरी खूप झाले असते. हा नवा पायंडा तुम्ही पाडत आहात. महिलांची ओळख त्यांच्या पतीच्या नावाने होते का, त्यांचे स्वतःचे काही अस्तित्व नसते का, त्यांचे काही योगदान नसते का,अशा प्रश्नांच्या फैरी जया बच्चन यांनी झाडल्या.त्यावर मिश्किलपणे हसत मॅडम, तुमचे छापील नाव जसे माझ्याकडे आले ते तसेच मी केवळ वाचले. बाकी काही नाही,असे उपसभापती सिंह म्हणाले.