मुंबई- मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सीमा देव यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. 2020 पासून त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासले होते. सीमा यांचे चिरंजीव अभिनय यांच्या मुंबईतील जुहू येथील घरी सीमा यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे लग्नाआधीचे नाव नलिनी सराफ असे होते. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य आणि दिग्दर्शक अभिनय ही त्यांची दोन मुले आहेत. 2013 मध्ये रमेश आणि सीमा यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. मागील वर्षी रमेश यांचे निधन झाले होते.
सीमा यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले. 1957 मध्ये ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. यात रमेश देव हे त्यांचे सहकलावंत होते. त्यांनी या चित्रपटात रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. चित्रपट क्षेत्रात ‘नलिनी’ नावाच्या अन्य अभिनेत्रीही असल्याने नलिनी सराफ यांनी आपले मूळ नाव सोडून ‘सीमा’ हे नाव घेतले. ‘जगाच्या पाठीवर’ अभिनेत्री म्हणून सीमा यांच्या रुपेरी जीवनाला आकार देणारा महत्त्वाचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आंधळ्या नायिकेच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्यानंतर ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 2017 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पीफ) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
सीमा आणि रमेश देव ही पडद्यावरची आदर्श जोडी समजली जात असे. रमेश देव यांची नायिका म्हणून सर्वप्रथम ‘ग्यानबा तुकाराम’ (1958) या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या. सीमा यांनी ‘दोन घडीचा डाव’, ‘राजमान्य राजश्री’, ‘अंतरीचा दिवा’, ‘पैशांचा पाऊस’, ‘आधी कळस मग पाया’, ‘प्रपंच’, ‘चिमण्यांची शाळा’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पडछाया’, ‘सुखी संसार’, ‘नंदिनी’, ‘काळी बायको’, ‘या सुखांनो या’, ‘जानकी’, ‘पोरींची धमाल बापाची कमाल’, ‘सर्जा’, ‘जिवा सखा’, ‘कुंकू’ या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. ‘भाभी की चूडियाँ’, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’, ‘मियाँ बीबी राजी’, ‘तकदीर’, ‘हथकडी’, ‘मर्द’ हे सीमा यांचे यशस्वी हिंदी चित्रपट होते.
सीमा देव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे की, भारतीय चित्रपटसृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कलाक्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे.
अभिनेते अशोक सराफ यांनी सीमा या आपल्या बहिणीसारख्या होत्या असे सांगत, ‘सीमा देव यांनी मराठी चित्रपटसृष्टी अनेक वर्षे गाजवली. त्यांचा स्वभाव खूप छान होता. एक चांगली अभिनेत्री आपण आज गमावली आहे,’ अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सीमा यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव विशेष लोकप्रिय होते. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला,’
असे म्हटले.
अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड
