मुंबई – ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत ‘जस्मिन’ची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे रस्ते अपघातात निधन झाले. ती केवळ ३२ वर्षांची होती. साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये वैभवीसोबत काम करणारे जेडी मजेठिया यांनी ट्वीट करत तिच्या निधनाची माहिती दिली. तिच्या मृत्यूमुळे मालिकाविश्वावर शोककळा पसरली आहे.
सोमवारी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे वैभवीच्या कारचा अपघात झाला. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीबरोबर तिथे पर्यटनासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले. हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत वैभवीसोबत काम केलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. तू खूपच लवकर आम्हाला सोडून गेलीस. त्यानंतर तिने वैभवीसोबतचा एक रिलसुद्धा शेअर केला. ‘अजूनही विश्वास बसत नाही’, असे कॅप्शन लिहित तिने वैभवीच्या आठवणींना उजाळा दिला. वैभवीने अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. दिपिका पदुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘तिमिर’ या चित्रपटातही तिने काम केले होते. याशिवाय सीआयडी, अदालत असा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या होत्या.
अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू
