मुंबई
प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांच्या कन्या तथा अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार उपस्थित होते. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडला.
‘राष्ट्रवादी पक्ष सर्व समाज स्तरावर काम करणारा असल्यामुळे विशेषतः महिलांसाठी काम करत असल्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला. तरुणांनी काठावर न बसता राजकारणात यावे असे म्हणतात त्यामुळे मी राजकारणात आले. फक्त जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी घेईन’, असे गार्गी यांनी यावेळी म्हटले.
गार्गी १९९८ पासून प्रायोगिक नाट्य चळवळीशी संबंधित आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेतून अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.