मुंबई –
नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका या तिन्ही माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेता अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली.
कर्करोगावर मात करून त्यांनी नव्याने कामाला सुरुवात केली. नुकतीच त्यांनी सूर्याची पिल्ले या नाटकाची घोषणा केली होती. आपल्या सहजसुंदर आणि प्रसन्न अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अतुल परचुरे यांनी अनेक नाटके, हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, प्रियतमा, टिळक आणि आगरकर ही नाटके त्यांनी केली. व्यक्ती आणि वल्ली नाटकातील पुलं देशपांडे यांच्या भूमिकेचे खुद्द पुलंनीच कौतुक केले होते. अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे बिल्लू, पार्टनर, ऑल दी बेस्ट या हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी कपिल शर्मा शोमध्येही बराच काळ काम केले. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.