मुंबई- अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यातील चौकशीला रोज नवीन वळण येत आहे. सैफ अली खानवर 16 जानेवारीला झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मात्र फॉरेन्सिक टीमने 21 जानेवारीला सैफच्या घरातून घेतलेले 19 बोटांचे ठसे शरीफुल इस्लामच्या बोटांच्या ठशांशी जुळत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी भलत्याच व्यक्तीला ताब्यात घेतल्याचा संशय पुन्हा निर्माण झाला आहे.
मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार शरीफुल इस्लामने सैफच्या घरात चोरी करण्यासाठी प्रवेश केला आणि नंतर चाकूहल्ला केला. मात्र, घटनास्थळावरून सापडलेले ठसे आणि अटक केलेल्या आरोपींचे ठसे जुळत नसल्याने पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि शरीफुल इस्लाम हे वेगवेगळे आहेत हाही प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत. या प्रश्नावर पोलीस मौन बाळगून आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञ प्रा. दिनेश राव यांनी तर सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिनेश राव म्हणाले की, लीलावती रुग्णालयाच्या मेडिको-लीगल रिपोर्टमध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे त्या चाकू हल्ल्याने झालेल्या जखमांसारख्या नाहीत. डॉक्टर भार्गवी पाटील यांच्या स्वाक्षरी केलेल्या अहवालात ज्या जखमांचा उल्लेख केला आहे त्या जखमा फक्त बोथट हत्यारानेच होऊ शकतात. चाकूने हल्ला केल्याच्या या जखमा नाहीत. सैफ अली खानच्या पेंटहाऊसमध्ये काम करणाऱ्या स्टाफ नर्सनेही याबाबतची माहिती दिली आहे. हल्लेखोर त्याच्यासोबत एक छडीसारखी वस्तू आणि पातळ करवतीसारखी वस्तू घेऊन आला होता, असे या नर्सचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, सैफ अली खानच्या मणक्याजवळून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला आहे, असा दावा लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. या चाकूचा फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यात त्याला दोन हातांवर आणि मानेच्या उजव्या बाजूला जखमा झाल्या. तसेच त्याच्या पाठीच्या मणक्यातही जखम झाली होती. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु डॉक्टरांनी त्याला अधिक आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णालयातून निघताना तो सहजपणे चालत बाहेर पडला. त्यामुळे सर्वांना तो खरेच जखमी होता का, असा प्रश्न पडला. या प्रश्नाला उत्तर मिळण्यापूर्वीच डिस्चार्जच्या सहाव्या दिवशी म्हणजेच काल सैफ अली खान त्याच्या पत्नी करिना कपूर-खानसोबत वांद्य्रातील सद्गुरु शरण इमारतीच्या बाहेर पडून कुठेतरी जाताना दिसले. ते दोघे कुठे जात होते याची माहिती मिळालेली नाही, पण त्यांची घराबाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ इतक्या लगेच आल्यामुळे याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, इतका गंभीर हल्ला झाल्यानंतर सैफ इतक्या लगेच बाहेर कसा फिरू शकतो?
लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफसाठी कॅशलेस उपचाराचा मेडिक्लेम तत्काळ मंजूर केला आणि त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याला विमा कंपनीकडून 25 लाख रुपयांची मंजुरी मिळाली. सैफ सहा दिवस रुग्णालयात होता आणि त्याचे 26 लाख रुपयांचे बिल झाले होते. त्याला 25 लाख रुपये एवढी मोठी रक्कम इतक्या लवकर मंजूर कशी झाली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता डॉक्टरांची संघटना मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. सैफ हा सेलिब्रिटी असल्यामुळे विमा कंपनीने त्याला विशेष सेवा पुरवली. कंपनी इतर ग्राहकांशी असे अजिबात वागत नाही. बहुतेक पॉलिसीधारकांना कंपनीकडून सुरुवातीला फक्त 50,000 रुपये मंजूर केले जातात. अशा प्रकरणांमध्ये, एफआयआर कॉपी विचारली जाते . हा सामान्य प्रक्रियेचा एक भाग आहे, असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे.
पोलिसांनी संशयित ठरवल्याने
लग्न मोडले! नोकरीवरून काढले
सैफच्या हल्ल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुलला ताब्यात घेण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये आकाश कनोजिया (31) या तरुणाचाही समावेश होता. छत्तीसगडच्या दुर्गमधून त्याला ताब्यात घेतले होते. पण तो मूळ आरोपी नसल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे आकाशचे आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झाले. आकाश म्हणाला की, मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला चाललो होतो. त्यावेळी आरपीएफने मला ताब्यात घेतले. त्यामुळे माझे ठरलेले लग्न मोडले. मला नोकरीवरूनही काढण्यात आले.
अभिनेता सैफ हल्ला प्रकरणात नवा धक्का! आरोपीचे बोटांचे ठसे जुळत नाहीत
