मुंबई – टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अभिनेता शिझान खान तुरुंगातून सुटून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, शिझानने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अटकेनंतर त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला होता, तो परत मिळवण्यासाठी शिझानने वसई न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शिझानचा हा अर्ज वसई न्यायालयाने मंजूर केला आहे. शिझानला परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाने पोलिसांना त्याचा पासपोर्ट परत करण्यास सांगितले. शिझान खान यांनी त्यांचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय यांच्यामार्फत न्यायालयात पासपोर्ट तात्पुरता परत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिझानचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जामिनावर असलेल्या आरोपीला काम करण्याची मुभा दिली जाते. त्याचआधारे वसई कोर्टाने शिझानचा अर्ज स्वीकारला.
अभिनेता शिझान खानला विदेश प्रवास करता येणार
