मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. हा धमकीचा कॉल फैजान नावाच्या व्यक्तीने केला होता, तो रायपूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी शाहरुख खानच्या टीमने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. भारतीय दंड संहितेनुसार कलम ३०८ (४), ३५१ (३) (४) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या क्रमांकावरून धमकी देण्यात आली आहे, तो क्रमांक छत्तीसगडमधील फैजान नावाच्या व्यक्तीच्या नावावर असून नंबर ट्रेस होताच पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले. धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर म्हटले की, शाहरुख खानचा जीव वाचवायचा असेल तर आम्हाला कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यानंतर आरोपीने फोन बंद केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड लावले आहेत. शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे