अभिनेता नागार्जुनचे कन्व्हेन्शन सेंटर पाडले

  • अतिक्रमणाचा आरोप

हैदराबाद – तेलुगू चित्रपट अभिनेते नागार्जुन यांनी रंगारेड्डी जिल्ह्यात शिल्पराममजवळील माधापूर येथे हायटेक सिटीजवळ कन्व्हेन्शन सेंटर उभारले होते. तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे सेंटर उभारल्याचा आरोप असल्याने आपत्ती निवारण आणि मालमत्ता संरक्षण एजन्सीच्या टीमने आज सकाळी ते पाडले.

थम्मीडी कुटी तलाव २९ एकरांवर पसरलेला आहे. या तलावाजवळच नागार्जुन यांनी कन्व्हेन्शन सेंटर उभारले होते. हे सेंटर ६.६९ एकरवर बांधण्यात आले होते. त्यात एकूण तीन हॉल होते. मोठ्या कार्यक्रमांसाठी ते वापरले जात होते. सेंटरमध्ये अनेक राजकीय पक्ष, मेळावे, विवाहसोहळे पार पडले आहेत. कुटी तलावाच्या ३.३० एकर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले अशी तक्रार भास्कर रेड्डी यांच्यासह अनेक जणांनी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईवर नागार्जुन यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही अवैध बांधकाम केलेले नाही. ही जागा भाडेतत्त्वावर आहे. तलावातील एक इंचही जमीन वापरलेली नाही. या केंद्राशी संबंधित सर्व तक्रारींवर स्थगिती आदेश आहे. आज चुकीच्या माहितीच्या आधारे सेंटर तोडले गेले. केंद्र पाडण्यापूर्वी आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. जर कोर्टाने तोडण्याचा निर्णय दिला असता तर मी स्वतः ते तोडले असते. अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या कारवाईवर न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी आशा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top