काबूल : अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी मोजण्यात आली. आज पहाटे ५:४९ वाजता ही घटना घडली. भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलपासून ८५ किमी अंतरावर होता. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे नोंद अद्याप नाही. यापूर्वी २२ मार्च रोजी अफगाणिस्तानमध्ये ६.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. या भूकंपामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २५० लोक जखमी झाले होते.
पाकिस्तानच्या हवामान खात्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदूकुश प्रदेश होता, तर त्याची खोली १८० किमी होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशिवाय भारत, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, भारतात उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. तथापि, भारताl कोठूनही जीवित किंवा मालमत्तेच्या हानीची माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर २४ तासांपर्यंत, भारत आणि त्याच्या आसपासच्या भागात भूकंपाचे १० धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ ते ४ इतकी मोजली गेली.