मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेले काही दिवस रंगलेल्या वादाला आज नवे वळण लागले.गृहमंत्री असताना अनिल देशमुख आपल्या स्वीय सचिवाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लाच घेत होते,असा आरोप मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली.
सचिन वाझे हा सध्या तुरुंगात आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जात असताना मीडियाशी बोलताना त्याने हा आरोप केला. अनिल यांच्याबरोबरच वाझेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावरही लाचखोरीचा आरोप केला. आपण यासंदर्भात एक पत्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे,असे वाझे याने सांगितले.आपण केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) आहेत,असा दावाही वाझे याने केला.
वाझेच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.वाझेने आपल्यावर केलेले आरोप ही देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे,असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला.’वाझेला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. वाझे हा विश्वास ठेवण्यालायक माणूस नाही,असे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने अँटेलिया प्रकरणात लेखी आदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे वाझेच्या आरोपांची मी फिकीर करत नाही,असे देशमुख म्हणाले.
अनिल देशमुख सचिवाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लाच घेत होते – सचिन वाझेंच्या आरोपाने खळबळ
