मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला बुकी आणि हवाला ऑपरेटर अनिल जयसिंघानी याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत. ‘एनआयए’ (राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा)देखील अनिल जयसिंघानीवर दहशतवादाला पैसा पुरवल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहे. जयसिंघानी हा सध्या तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.
क्रिकेट बुकी आणि हवाला ऑपरेटर असलेल्या अनिल जयसिंघानी २०१५ पासून मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला हवा होता. त्याला २० मार्चला गुजरातमधून अटक केल्यानंतर त्याची जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. पण त्याच्यावरील गुन्ह्याची व्याप्ती पाहता अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस त्याचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्यावर मुंबईसह ठाणे, अहमदाबाद, आसाम, गोवा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात १७ फौजदारी गुन्हे दाखल आहेत. अहमदाबाद येथील ईडी कार्यालयाने त्याच्यावर १० हजार कोटींच्या हवाला प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये बेटिंग आणि दुबई व कराचीतील हवाला प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचाही आरोप आहे. जयसिंघानी याचे वकील मृगेंद्र सिंग आणि मनन संघाई यांनी त्याच्यावरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकरणाची माहिती समोर आल्यापासून मुंबई पोलीस मात्र अनिल जयसिंघानीची कोठडीत रद्द होऊ नयेत, म्हणून प्रयत्न करत आहेत. यासाठी गंभीर गुन्ह्यांसाठी लावण्यात येणाच्या ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याची तयारी मुंबई पोलीस करत आहेत.