रायपूर : कोयलीबेडा विभागाचे फूड ऑफिसर रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. खेरकट्टा परळकोट जलाशयाच्या ओव्हरब्रिजवर १५ फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात त्यांचा महागडा मोबाईल पडला. तो शोधण्यासाठी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात जुंपण्यात आले. मात्र मोबाइल सापडला नाही. त्यानंतर या अधिकाऱ्याने धरणातील लाखो लिटर पाणी बाहेर मोबाईल शोधला.
सुट्टीवर फिरायला आलेल्या या फूड ऑफिसरने धरणात पडलेला मोबाईल काढण्यासाठी धरणात पाणबुडेही उतरवले. मात्र फोन सापडला नाही. त्यानंतर फोन शोधण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ३० एचपी क्षमतेचा पंप आणून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. तीन दिवस पंपाद्वारे जलाशयातून पाण्याचा उपसा चालू होता. हे समजताच आधी पंप लावायला परवानगी देणारे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हा पंप बंद करायला लावला. त्यानंतर पुन्हा शोध घेतला असता मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला होता. यात २१ लाख लिटर पाणी वाया गेले. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसे होते. सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी एवढ्या प्रमाणात केवळ मोबाईलसाठी वाया घालवण्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.