नवी दिल्ली- भारतात चीनी वस्तूंवर बहिष्काराची भाषा बोलली जात असतानाच उद्योजक अदानी समूहाची चीनमध्ये एन्ट्री झाली आहे. भारताच्या शेजारील देशात व्यवसाय वाढवण्यासाठी अदानी समूहाने तेथे उपकंपनी स्थापन केली आहे. यामार्फत आता अदानी समूह चीनमध्ये आपला व्यवसाय वाढवणार आहे.
अदानी एंटरप्रायझेसची (एईएल) उपकंपनी अदानी ग्लोबल पिटीई, सिंगापूर मार्फत स्थापन केली आहे. समूहाची प्रमुख फर्म अदानी एंटरप्रायझेसने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, सिंगापूरस्थीत उपकंपनीने २ सप्टेंबर २०२४ रोजी चीनमधील शांघाय स्थीत अदानी एनर्जी रिसोर्सेस कंपनी (एईआरसीएल) ही पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची स्थापना पुरवठा साखळी उपाय आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करण्यासाठी केली आहे.
एईएलमध्ये समूहाचे खाणकाम, रस्ते, विमानतळ, डेटा सेंटर आणि जल पायाभूत सुविधा हे व्यवसाय आहेत. २ सप्टेंबर २०२४ रोजी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करून कंपनी स्थापन केली आहे. मात्र अद्याप तेथे आपला व्यवसाय सुरु केलेला नाही. एईएलने आफ्रिकन राष्ट्रात विमानतळांचा ताबा घेणे, ऑपरेट करणे, देखरेख करणे, विकसित करणे, डिझाइन करणे, बांधणे, आधुनिकीकरण करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी नवीन युनिट स्थापन केले आहे. सध्या देशातील सात विमानतळ चालवणारा हा समूह परदेशात विस्तार करीत आहे.