हैदराबाद – तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसचा निषेध म्हणून ‘अदानी – रेवंत भाई भाई’ असे लिहिलेले टी शर्ट परिधान करून सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले.
उद्यागपती गौतम अदानी यांच्याबद्दलचे काँगेसचे धोरण दुटप्पीपणाचे आहे असा बीआरएसचा आरोप आहे. त्याबद्दल बोलताना बीआरएसचे हंगामी अध्यक्ष के टी रामाराव म्हणाले की, अदानींबद्दल काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड करणे गरजेचे असल्याने आम्ही अदानी-रेवंत भाई भाई असे घोषवाक्य लिहिलेली टी शर्ट घालून सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अशाच प्रकारे मोदी-अदानी एक है असे घोषवाक्य लिहिलेले टी शर्ट परिधान करून निषेध केला होता. पंतप्रधान मोदी हे अदानींना पाठीशी घालतात असा आरोप राहुल गांधी करतात. पण तेलंगणामध्ये नेमकी विरूद्ध परिस्थिती आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची गौतम अदानीशी घनिष्ठ मैत्री आहे,म्हणजे केंद्रात ज्या अदानींच्या विरोधात काँग्रेसचे नेते बोलतात त्याच अदानींशी तेलंगणामध्ये काँग्रेसचे सख्य आहे. राहुल गांधी यांना जर मोदी-अदानी एक है असे लिहिलेले टी-शर्ट परिधान करून संसदेत प्रवेश करू दिला जातो तर आम्हाला का रोखले जाते,असा सवालही रामाराव यांनी केला.