न्यूयॉर्क – भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या घोटाळ्याचा अहवाल देऊन खळबळ उडवणार्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या संस्थापकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक नाथन अँडरसन यांनी एक्सवर एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. घोटाळ्याचे गौप्यस्फोट करून जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांना हादरवणार्या हिंडेनबर्गने अचानक हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिंडेनबर्ग रिसर्च ही अमेरिकन कंपनी 2016 मध्ये स्थापन झाली. शेअर बाजार, इटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह यांच्यावर संशोधन करणे हा या कंपनीचा हेतू होता. शेअर बाजाराधील पैशाचा बेकायदा वापर, आपल्या फायद्यासाठी बड्या कंपन्यांकडून खात्यांचे गैरव्यवस्थापन, सट्टेबाजीतून इतर कंपन्यांचे नुकसान, निधी इतरत्र वळवणे अशा विषयांवर संशोधन करून कंपनी अहवाल प्रसिद्ध करत असे. हिंडेनबर्गने 2016 ते 2024 दरम्यान अमेरिकेच्या आरडी लीगल, पर्शिंग गोल्ड, ओपको हेल्थ, रॉयट ब्लॉकचेन, निकलो, ट्वीटर, ब्लूम एनर्जी, एचएफ फूडस आणि कॅनडाची एफ्रिया यांचा घोटाळा उघड आहे. त्याचा या कंपन्यांना मोठा फटका बसला. भारतीय कंपनी अदानीबाबत गौप्यस्फोट केल्याने या कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला.
गेल्या वर्षी हिंडेनबर्गने अदानी कंपनीविषयी अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर भारतात हाहाकार उडाला. अदानी कंपनीने शेअरचे भाव कृत्रिमरित्या वाढवून गुंतवणूकदारांचे नुकसान केले, वाढीव किमतीच्या शेअरच्या आधारे मोठमोठी कर्ज घेऊन घोटाळा केला असा आरोप केला गेला. हा अहवाल प्रसिद्ध होताच अदानी कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आणि गौतम अदानींच्या वैयक्तिक संपत्तीतही मोठी घट झाली. 20 हजार कोटींची इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) मागे घेण्याची नामुष्की अदानीवर ओढवली. या अहवालाचे पडसाद संसदेतही उमटले होते. त्यानंतर सेबीने या प्रकरणाची चौकशी केली होती. परंतु नंतर सेबीकडून अदानी समूहाला क्लीनचिट देण्यात आली. गेल्या वर्षी हिंडेनबर्गने आणखी एक अहवाल प्रसिद्ध करून असा दावा केला की, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी अदानी समूहाशी संबंधित विदेशी संस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे. बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अशा ऑफशोअर फंडात भागीदारी होती, ज्यामध्ये गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते व ते या कंपन्यांचे चेअरमन होते. विशेष म्हणजे, या प्रकरणी सेबीने चौकशी करून माधबी बुच यांनाही क्लीनचिट दिली होती.
हिंडेनबर्ग रिसर्चने अचानक गाशा गुंडाळण्याच्या निर्णयामागे विशेष कारण नाही, असे नाथन अँडरसन यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांचे कामकाज बंद करण्याची घोषणा करताच आज शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये जोरदार तेजी आली. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
नाथन अँडरसनची भावूक पोस्ट
मागील वर्षीच मी माझे कुटुंब, मित्र आणि आमच्या टीममधील सगळ्यांना ही गोष्ट सांगितली होती की, मी हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय घेत आहे. आम्ही जे ठरवले होते ते पूर्ण झाल्यानंतर कंपनी बंद करण्याचा आमचा निर्णय आधीच झाला होता. आज हे सर्व तुमच्यासोबत शेअर करण्याचा
दिवस आला आहे.
सुरुवातीला मला माहीत नव्हते की, समाधानकारक मार्ग शोधणे शक्य होईल की नाही. हा एक सोपा पर्याय नव्हता. परंतु मी धोका असूनही त्याकडे दुर्लक्ष केले आणि या कामाकडे लक्ष केंद्रित करून खूप लवकर पुढे गेलो. मी हे काम सुरू केले तेव्हा मला शंका होती की, मी ते करू शकेन की नाही. मला वित्तीय क्षेत्राची पार्श्वभूमी नव्हती. या क्षेत्रात माझे कोणीही नातेवाईक नव्हते. मी सरकारी शाळेत शिकलो. मी हुशार विक्रेता नाही. मला योग्य कपडे घालायचे हेही माहीत नाही. मी गोल्फ खेळू शकत नाही. केवळ 4 तास झोप घेऊन काम करू शकेन असा मनुष्य मी नाही.
आत्तापर्यंत मी जिथे नोकरी केली तिथे मी चांगला कर्मचारी होतो. पण अनेक कंपन्यांमध्ये मला दुर्लक्षित करण्यात आले. जेव्हा मी हे काम सुरू केले तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. तीन तीन केसेसमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, माझ्याकडील सर्व पैसे संपले होते. मला जागतिक दर्जाचे वकील ब्रायन वूड यांचा पाठिंबा मिळाला नसता, त्यांनी माझ्याकडे पैसे नसतानाही केस चालवली नसती, तर मी सुरुवातीच्या टप्प्यातच अपयशी ठरलो असतो.
मी जणू एका नवजात मुलाचा पिता होतो, तेव्हाच मला बाहेर काढण्यात आले. मी घाबरलो होतो, पण जर मी पुढे गेलो नाही तर मी तुटून पडेन हे मला माहीत होते. माझ्याकडे एकमेव पर्याय होता तो म्हणजे पुढे जात राहणे.नकारात्मक विचारांना बळी पडणे आणि इतरांच्या विचारांवर विश्वास ठेवणे खूप सोपे असते. विशेषतः सगळे वाईट घडते आहे, असे वाटते. परंतु यावर मात करणे शक्य असते. मी भय आणि असुरक्षिततेला न जुमानता पुढे गेलो. मग हळूहळू मला आत्मविश्वास गवसला. एकामागून एक आणि कोणत्याही योजनेशिवाय, आम्ही 11 अविश्वसनीय लोकांची टीम तयार केली. भ्रष्टाचार, खोटेपणा, गैरव्यवहार यावर आम्ही पुरावे दाखवून प्रहार केले. आम्ही असे लढे दिले आहेत की, जे कुठल्याही व्यक्तीपेक्षा किंवा कुठल्याही साम्राज्यापेक्षा मोठे आहेत. कारण ते लढे सत्य समोर आणणारे होते. लबाडी, भ्रष्टाचार, नकारात्मकता याचा सुरुवातीचा परिणाम हा प्रभावी असतो, पण सत्याची वाट आम्ही सोडली नाही. त्यामुळे ही वाटचाल करू शकलो. आम्ही काही साम्राज्यांना धक्के देण्याचे काम केले हेदेखील आम्हाला माहीत आहे. आमच्या कामामुळे किमान 100 व्यक्तींच्या विरोधात दिवाणी खटले दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही अब्जाधीश आणि उच्चभ्रूंचा समावेश आहे.
आम्ही आताच काम बंद का केले? तर त्याचे काही विशेष कारण नाही. कोणापासून धोका नाही, आजारपण नाही किंवा कोणताही मोठा वैयक्तिक मुद्दाही नाही. मला कुणीतरी एकदा सांगितले की, एका विशिष्ट टप्प्यानंतर यशस्वी करिअर एक स्वार्थी कृती बनते. सुरुवातीला मला वाटले की, मला स्वतःला काही गोष्टी सिद्ध करण्याची गरज आहे. आता मला स्वतःसाठी थोडा आराम मिळाला आहे. कदाचित माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तो मिळाला आहे. मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, माझे छंद जोपासण्यासाठी आणि प्रवास करण्यास उत्सुक आहे. मी त्यांच्यासाठी पैसे कमावले आहेत. मी माझे पैसे इंडेक्स फंड आणि कमी तणावाच्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा विचार करत आहे. सध्या मी माझ्या टीममधील प्रत्येकाला जिथे असायला हवे, तिथे पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.