मुंबई – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथे गेली अनेक वर्षे सुरू असलेली माउंट कार्मेल कॉन्व्हेंट ही खासगी उच्च माध्यमिक शाळा अहमदाबादच्या अदानी फाउंडेशनला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कुठलेही शुल्क न आकारता ही अनुदानित खासगी शाळा अदानी फाऊंडेशनला आयती देण्यात आली आहे. यानंतर आणखी शाळाही अदानी समूहाला दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे या निर्णयावरून संताप व्यक्त होत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी याचा शासन आदेश जारी केला आहे. कार्मेल एज्युकेशन सोसायटीद्वारे घुघुस येथे माउंट कार्मेल कॉन्व्हेंट माध्यमिक शाळा ही 12 वी पर्यंत शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची अनुदानित खासगी शाळा चालवली जाते. मदर तेरेसा यांच्याशी संबंधित ख्रिश्चन संस्था ही आयसीएसई बोर्डाची शाळा चालवते. अहमदाबादच्या अदानी फाऊंडेशनकडे ही शाळा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर प्रचंड वेग घेत अवघ्या तीन महिन्यांत या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली.ही शाळा अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करताना सरकारने शाळा चालविण्याच्या सामान्य अटी लागू केल्या आहेत.
अदानी समूह शाळेतील किमान पट संख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल करता येणार नाही. शाळा विनाअनुदानित तत्त्वावरील असल्याने शाळेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची जबाबदारी व्यवस्थापन स्वीकारणार्या संस्थेवर राहील. विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी सर्व बाबी तपासून व आवश्यक अटींचा समावेश करून शाळेचे व्यवस्थापन बदलाबाबत पुढील 15 दिवसांत कार्यवाही करायची आहे. भविष्यात व्यवस्थापनाबाबत किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार आल्यास शाळेचे हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे ठेवण्यात आले आहेत.
शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनला देताना सरकारने कुठलेही शुल्क संस्थेला आकारले नाही. शाळेची तयार प्रशस्त इमारत, मैदान, कर्मचारी, विद्यार्थिनी या सर्व गोष्टी अदानी फाऊंडेशनला आयत्या मिळणार आहेत. त्यामुळेच या निर्णयाची चर्चा सुरू आहे. अदानी उद्योग समूहाने आता आपल्या अदानी फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षण क्षेत्रातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे, असे म्हटले जात आहे. हा शिक्षणाच्या अदानीकरणाचाच प्रकार आहे, अशीही टीका होत आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानींच्या नावे करणार आहे का? शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेले महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांबरोबरच आता गौतम अदानी यांचाही फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे. विधान परिषदेचे ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले की, देशाला शिक्षणाचा मार्ग दाखविणार्या महाराष्ट्रावर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. जमीन, उद्योग घेतल्यावर आता शाळा देखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार या सरकारने अदानी समूहाकडे दिला आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण सरकारने दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रपुराची शाळा अदानींकडे देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, राज्यातील संपूर्ण व्यवस्थाच अदानीच्या हातात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांचे एजंट म्हणून काम करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व इतर नेते हे त्यांचे सब एजंट आहेत. राज्यातील सरकारला शाळा, कॉलेज, ऐतिहासिक वास्तू या अदानीच्या घशात घालायच्या आहेत. अदानीना चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र आपल्या घशात घालायचा आहे. विदर्भात तर अनेक जमिनींवर अदानीचे बोर्ड लागलेले आहेत. आज त्यांना चांदा म्हणजेच चंद्रपूरची शाळा दिली, उद्या ते बांद्याची जागाही अदानीच्या घशात घालतील. त्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री असे सगळेच जण काम करत आहेत. मुख्यमंत्री त्यांचे बूट चाटत आहेत. धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई अदानीच्या खिशात घालायचा प्रयत्न सुरू आहे. या बाबतीत भाजपाने एकदा तरी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. ते तसे करणार नाहीत. राज्यात जोपर्यंत बाळासाहेबांची मूळ शिवसेना आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे व आमच्यासारखे त्यांचे कार्यकर्ते हे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही.