मुंबई – अदानी यांच्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाला रेल्वेच्या जागेत रेल्वे वसाहत बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. रेल्वेच्या २७.५७ एकर जागेवर येत्या ३ वर्षात ४ इमारती उभ्या करण्यात येणार आहे.या रेल्वे वसाहतीचे काम या महिन्यातच सुरु होणार आहे. ही रेल्वे वसाहत दोन वर्षात बांधून पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी ही पहिलीच परवानगी असल्याचे प्रकल्पाच्या प्रमुखांनी म्हटले आहे. रेल्वे जमीन विकास प्रधिकरणाने १३ मार्च २०२४ रोजी रेल्वेची २७.५७ एकर जागा अदानींना दिली होती. यात माहिम स्थानकानजिकच्या रेल्वेच्या भंगार गोदामाच्या जागेचाही समावेश आहे. धारावी पुर्नविकास प्रकल्पांतर्गत एकूण ६०० एकर जागेचा विकास करण्यात येणार असून या ठिकाणी १२ लाख घरे बांधण्यात येणार आहेत. रेल्वे वसाहत हे या प्रकल्पातील पहिले बांधकाम आहे. धारावीकरांच्या पुर्नवसनाआधी अदानी रेल्वेला या इमारती हस्तांतरीत करणार आहे. या ठिकाणी एकूण ४ इमारती बांधण्यात येणार असून त्यातील ३ इमारती ३६ मजली असतील. अदानी प्रकल्पाने रेल्वेला या जागेसाठी १ हजार कोटी रुपये आधीच दिले असून उर्वरित २८०० कोटी रुपये १७ वर्षांनंतर देण्यात येणार आहेत. रेल्वेच्या २७.५७ एकर जागेपैकी १५ एकर जागेवर अतीक्रमण झाले असून तिथे ५००० भाडेकरु राहात आहेत.
अदानींच्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाला रेल्वे वसाहत बांधकामाला परवानगी
