मुंबई
शिवसेनेच्या मेट्रो कारशेडमुळे चर्चेत आलेली मुलुंडमधील मिठागराची जागा अखेर आता अदानींच्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. केंद्र सरकारने येत्या ९९ वर्षांच्या भाडेपट्टी (लिज)वर ही जागा राज्य सरकारच्या ताब्यात दिली. या जागेवर धारावी पुर्नविकासात पात्र नसलेल्या स्थानिकांना घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले असून स्वस्तातील घरे बांधण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र सरकारने धारावी पुर्नविकासासाठी ही मिठागराची जागा केंद्र सरकारकडे मागितली होती. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मिठाची निर्मिती होत नसल्याने व मिठागराचा भाडेकरारही संपल्यामुळे ही जागा राज्य सरकारला देण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ही जागा स्वस्तातील घरे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या शहर विकास योजनेमध्ये २०३४ पर्यंत स्वस्त दरातील घरांसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली होती. या जागेपैकी काही जागा मेट्रो मार्ग क्रमांक ६ च्या कारशेडसाठी राखून ठेवण्यात आली आहे. या जागेवर बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये पावसाळ्यात पाणी भरण्याची त्याचप्रमाणे या ठिकाणच्या पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. तथापि शहरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही शक्यता नाकारल्या आहेत. या जागेवर पुर्नविकास होऊ नये यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडमधील नागरिकांनी आंदोलनही केले होते. राज्य सरकार ही जागा अदानींना देणार असून या ठिकाणी धारावीतील लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
अदानींच्या धारावी पुर्नविकासासाठी मिठागराची जागा भाडेपट्टीवर राज्य सरकारच्या ताब्यात
