अदानींच्या खिशात आणखी एक बंदर!

नवी दिल्ली- एकीकडे हिंडेनबर्ग अहवालानंतर रोज तोटा सहन करणाऱ्या अदानी समूहाने आठवडाभरात दोन कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. अदानी समूहाने केंद्रशासित पुद्दुचेरीतील कराईकल बंदराची खरेदी केली आहे. या बंदराच्या अधिग्रहणासाठी उद्योगपती गौतम अदानींनी 1,485 कोटी रुपये मोजले असून, या करारानंतर आता अदानींकडे देशभरातील 14 बंदरे आली आहेत.
कराईकल पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडची (कराईकल बंदर) स्थापना 2009 मध्ये झाली होती. ते चेन्नईच्या दक्षिणेला 300 किमी अंतरावर आहे. कराईकल देशातील एक प्रमुख बंदर आहे. या बंदरात तीन रेल्वे साइडिंग, 600 हेक्टर जमीन आणि 21.5 दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळण्याची क्षमता आहे. 2022-23 साली 1 दशलक्ष मेट्रिक टनाची आवकजावक केली होती. राष्ट्रीय कायदा न्यायाधिकरणची मंजुरी मिळाल्यानंतर कराईकल बंदराचे अधिग्रहण करण्यात आले. हा करार पूर्ण झाल्याची घोषणा अदानी समुहाने निवेदन काढून केली असून या निवेदनात अदानी पोर्टचे सीईओ करण अदानी यांनी म्हटले की, ‘कराईकल बंदराच्या अधिग्रहणासाठी 1,485 कोटी रुपयांचा करार झाला आहे . हे बंदर तामिळनाडूच्या कंटेनर आधारित औद्योगिक केंद्र आणि प्रस्तावित रिफायनरी जवळ आहे. येत्या 5 वर्षांत बंदराची क्षमता दुप्पट करण्याची कंपनीची योजना आहे.\’
अदानीच्या परदेशी व्यवहाराची
सेबी चौकशी करणार!
अदानी समुहाने परदेशी कंपन्यांशी केलेल्या व्यवहाराची सेबी चौकशी करणार आहे. गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित किमान तीन परदेशी कंपन्यांसोबत अदानी समुहाशी निगडित सौद्यातील \’रिलेटेड पार्टी\’ नियमांचे उल्लंघन केल्याचा तपास सेबी करत आहे. या अहवालात तीन कंपन्यांनी गौतम अदानींच्या अनलिस्टेड कंपन्यांमध्ये भरीव गुंतवणूक केली आहे. गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी हे एकतर लाभार्थी मालक किंवा संचालक आहेत किंवा ते तीनही परदेशी कंपन्यांशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेले आहेत.मात्र त्यांनी ही माहिती जाहीर न केल्यामुळे \’रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स\’शी संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास बाजार नियामक सेबी करणार आहे.

Scroll to Top