मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये केलेल्या वक्तव्यावरून आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यावेळी बारामतीतून निवडणूक निश्चित हरणार, असा दावा राऊत यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काल अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी १९९१ पासून आजपर्यंत बारामतीमध्ये एवढी विकासकामे करूनही लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा यांचा पराभव झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्याचबरोबर तुम्हाला एकदा माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी आमदार मिळाला पाहिजे. तसे झाले तरच तुम्हाला मी केलेल्या कामांचे मोल कळेल, असे भावनिक वक्तव्य केले होते.
अजित पवार यांच्या या वक्तव्याचा आधार घेत राऊत म्हणाले की, अजित पवार यावेळी बारामतीतून लढले तर त्यांचा पराभव निश्चित आहे. हे त्यांनादेखील पक्के माहीत आहे. म्हणूनच तर ते आता अशा प्रकारची भाषा करीत आहेत. चाळीस वर्षे ज्या काकांनी भरभरून दिले त्यांच्याशी अजित पवार यांनी केलेली गद्दारी महाराष्ट्राला आणि बारामतीकरांनाही रुचलेली नाही. त्यामुळे त्यांना बारामतीकर यंदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.