अजित पवार कुटुंबाची जप्त केलेली मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली – मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिल्लीच्या ट्रिब्यूनल कोर्टाने दिला आहे. अजित पवार यांच्या पक्षाने विधानसभेची लढाई तर जिंकलीच पण त्यानंतर मालमत्तेवरून आयकर विभागाशी सुरू असलेली न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकलेली आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. तसेच अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉई गुरु कमोडिटी, फायर पॉवर अ‍ॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आहे. तसेच, अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत. अशा तर्‍हेने अजित पवार यांनी न्यायालयीन लढाई जिंकून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या त्यांच्या विरोधकांना न्यायालयीन लढाईतसुद्धा पराभूत केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top