मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीत एकटे पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेवटी अजित पवार युतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढतात की काय? असा सवाल निर्माण होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत अजित पवारांच्या विरोधात धुसफूस सुरू झाली. सुरुवातीला निधीवाटपाबाबत अजित पवार अन्याय करतात अशा तक्रारी शिंदे गटाने केल्या. त्यानंतर अजित पवारांच्या प्रवेशाने निवडणुकीत भाजपाला कोणताच फायदा झाला नाही, अशी चर्चा सुरू झाली. भाजपाचे एकेक नेते याच अनुषंगाने बोलू लागले. यानंतर आता लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांना टार्गेट केले जात आहे. अजित पवार गटाने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना हे नाव बदलून केवळ ‘माझी लाडकी बहीण’ योजना असे केले आणि या योजनेचे श्रेय अजित पवारांना देण्याचा प्रयत्न केला. यावर शिंदे गटाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याचबरोबर भाजपानेही खेळी करत लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर केवळ मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो लावले. त्यातून अजित पवारांचा फोटो वगळण्यात आला. काल रात्री वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
फडणवीस यांना भेटले. यावेळीही अजित पवार कुठेही नव्हते. अनेक दिल्लीचे दौरे एकनाथ शिंदे आणि फडणवीस करतात त्यावेळी अजित पवार दिसत नाहीत. आज एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच म्हटले की, शिंदे गटाशी म्हणजे शिवसेनेशी आम्ही युती केली ती नैसर्गिक युती आहे. शिवसेनेबरोबर आम्ही अनेक वर्षे आहोत. अजित पवारांशी जी युती केली ती मात्र नैसर्गिक युती नव्हती. ती केवळ राजकीय युती होती. त्याकाळची गरज होती. संधी आली तर ती सोडायची नसते. यानंतर देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, त्यांना सेटल व्हायला थोडा वेळ लागेल. पण जे अजित पवार कधीही मंदिरात जात नव्हते ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले. त्यामुळे आमचे गुण त्यांना कधीतरी लागणारच आहेत. मात्र राजकीय विश्लेषकांचे आणि घडणार्या घडामोडींवरून हे स्पष्ट दिसते आहे की, महायुतीत भाजपा आणि शिवसेना एकीकडे आणि अजित पवार दुसरीकडे असे दोन गट पडले आहेत. याचा विधानसभेतही फटका बसणार आहे. भाजपा हिंदुत्वाचा झेंडा घेऊन पुढे जात असताना अजित पवार आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व टिकवत मुस्लिमांना भेटून वक्फ बोर्ड कायद्यातील बदलाबाबत केंद्रीय नेत्यांशी बोलतो असे सांगतात. अजित पवारांनी स्वत:च्या पक्षाचा स्वतंत्र प्रचार आणि प्रसारही जोमाने सुरू केला आहे. यामुळे स्वत:ची ताकद वाढवून येत्या काळात अजित पवार महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र ताकदीने लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.