मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांचे 16 उमेदवार निश्चित झाले आहेत. या 16 उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप करून प्रचार सुरू करण्यास सांगितले आहे.
अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर या एबी फॉर्मचे वाटप सुरू आहे. दिलीप वळसे-पाटील, दत्तात्रय भरणे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ यांना फॉर्म दिले आहेत. एबी फॉर्म मिळालेल्यांना कामाला लागण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
महायुतीत अधिकृत जागावाटप अजूनही जाहीर झालेले नाही. भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. त्यानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्मच ठेवले. यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी सकाळपासून एकेक इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह येत होते आणि फॉर्म घेऊन जात होते. त्यामुळे इथे मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळपर्यंत 16 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.
काँग्रेस आणि भाजपातून अजित पवार गटात आलेले हिरामण खोसकर आणि भरत गावित यांनाही एबी फॉर्म देण्यात आले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मत न देता इतर पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याचा आरोप खोसकर यांच्यावर होता. त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आता ते अजित पवार गटाकडून इगतपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. एबी फॉर्म मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना हिरामण खोसकर म्हणाले की, सकाळी 8 वाजता मला फोन आला आणि आता लगेच मी इथे आलो. दादांनी मतदारसंघात काम करायला सांगितले आहे. काँग्रेसकडे मी दोन महिने जात होतो, पण त्यांनी ऐकले नाही. माझी फसवणूक होईल असे वाटले. म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये आलो. एबी फॉर्म घ्यायला मी 500 लोकांबरोबर आलो आहे. यावरून निवडणूक कशी होईल ते बघा.
पूर्वी भाजपात असलेले भरत गावित यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भरत गावित यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. त्यावेळी त्यांचा काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांनी पराभव केला होता. ते यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार आहेत. एबी फॉर्म मिळाल्यानंतर ते म्हणाले की, मला उमेदवारी दिल्याबद्दल अजितदादा, सुनील तटकरे यांचे आभार. नवापूर या राखीव मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. मी नक्की जिंकून येणार आहे. तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मी येत्या 24 ऑक्टोबरला फॉर्म भरणार आहे. जनता जनार्दन मला नक्की विजयी करील. लातूरच्या उदगीरमधून भाजपाकडून विश्वजीत गायकवाड हे इच्छुक होते. मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. मात्र अजित पवार गटाने संजय बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीचे 16 उमेदवार
1) चेतन तुपे (हडपसर), 2) संजय बनसोडे (उदगीर), 3) सुनील टिंगरे (वडगाव शेरी), 4) दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव),
5) दौलत दरोडा (शहापूर), 6) राजेश पाटील (चंदगड), 7) दत्तात्रय भरणे (इंदापूर), 8) आशुतोष काळे (कोपरगाव), 9) हिरामण खोसकर (त्र्यंबकेश्वर), 10)नरहरी झिरवळ (दिंडोरी), 11) छगन भुजबळ (येवला), 12) भरत गावित (नावापूर), 13) बाबासाहेब पाटील (अहमदपूर), 14) अतुल बेनके (जुन्नर), 15) नितीन पवार (बागलाण), 16) इंद्रनील नाईक (पुसद)