चिपळूण – अजित पवार यांच्या गटाने राज्यातील महायुतीच्या सत्तेत सहभागी होऊन वर्षभराहून अधिक काळ उलटला तरी भाजपाशी त्यांचे सूर नीट जुळलेले नाहीत.आता तर अजित पवार गटाने आपली वेगळी भूमिका जाहीरपणे मांडायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणार्या भाजपा नेत्यांना अजित पवारांच्या गटाने जाहीर उघड विरोध केला आहे. आज अजित पवार यांनी भाजपाला स्पष्ट सुनावले की, काही जण चुकीचे बोलले, याचा अर्थ ते आमचे मत नाही. इतर समाजाला, जातीला, धर्माला तुम्ही कमी लेखत असाल, दोष देत असाल तर त्यांच्यावर टीकाटिप्पणी करत असाल तर हे चालणार नाही. अजित पवारांची ही भूमिका भाजपाच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी फारकत घेणारी असल्याने महायुतीत आता अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.
आज चिपळूण येथे झालेल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी कुणालाही वेडेवाकडे बोलायला अधिकार दिलेला नाही. संविधानामुळे तुम्हाला तुमची विचारधारा मांडता येईल, तुमचे मत मांडता येईल. तुम्हाला जे सांगायचे ते सांगता येईल. परंतु ते सांगताना कुठल्या तरी इतर समाजाला, जातीला धर्माला कुठेतरी तुम्ही कमी लेखत असाल, त्यांना दोष देत असाल तर त्यांच्यावर टीकाटिप्पणी करत असाल तर हे चालणार नाही, तुम्ही एकमेकांचा आदरही ठेवला पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, हे यशवंतराव चव्हाणसाहेबांनी सांगितले आहे. त्या रस्त्यांनी आपल्या सगळ्यांना जायचे आहे. चव्हाणसाहेबांची आठवण आणि शिकवण आपल्याला कधीही विसरता कामा नये. त्यामुळे काही जण चुकीचे बोलले, तर याचा अर्थ महायुतीचे ते मत नाही. तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचे मत सांगितले आहे. मीपण सांगतो, प्रत्येकाला आपली भूमिका योग्य पद्धतीने, योग्य भाषेत, योग्य शब्दांत मांडण्याचा अधिकार आहे. जर कुणी वेडीवाकडी वक्तव्ये केली तर कायदा त्याचे काम करेल. जातीजातीत, समाजासमाजामध्ये अंतर पडू द्यायचे नाही. जातीय सलोखा ठेवायचा आहे. एकी ठेवायची आहे. ती तुम्ही वर्षानुवर्षे तुम्ही ठेवत आला आहात. आपण ही एकी टिकवली, तरच आपला देश पुढे जाणार आहे. तरच महाराष्ट्र पुढे जाणार आहे, हे कदापि विसरता येणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही वादग्रस्त विधाने करणार्या भाजपा नेत्यांचा निषेध केला. ते म्हणाले की, बेताल वक्तव्य करणार्या नितेश राणेंसारखा एखादा बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर त्याचाही निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. सत्तेत राहून जाहीर निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादीने दाखवली आहे. आम्ही सत्तेत फक्त सत्तेसाठी नाही. तर आमच्या विचारांवर ठाम राहून आम्ही भविष्यात काम करणार आहोत.
यावर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, महायुतीमधील कोणत्याही पक्षाने लांगुलचालनाचा प्रकार केला तरी ते चालणार नाही, अशी प्रतिक्रिया नाव न घेता दिली. त्यामुळे पुढील काळात महायुतीत एकत्र असूनहूी भाजपा आणि अजित पवार यांच्यातील नात्यातला ताण अधिक वाढणार असल्याची शक्यता आहे.
धारावीत मशिदीवरून तणाव
निवडणूक आली की कारवाई का?
मुंबई – मुंबईतल्या सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये आज एका मशिदीवरून तणाव निर्माण झाला. धारावीच्या 90 फीट रोडवरील ‘मेहबूब-ए-सुबानिया’मशीद आहे. या मशिदीतील दोन मजले अधिकृत आहेत, तर तिसर्या मजल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याने पालिकेने काल रात्री कारवाईची नोटीस पाठवली होती. त्यानंतर रात्रीपासून स्थानिक मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊन संपूर्ण रस्ता अडवला होता. मुंबई महापालिकेचे अधिकारी आज सकाळी मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पोहोचले, तेव्हा कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या वाहनांची जमावाने तोडफोड केली. काही आंदोलकांनी धारावीला जाणारे रस्तेही रोखले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ केली. त्यानंतर कारवाई काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याने जमाव शांत झाला. या भागातील स्थानिक लोकांचे म्हणणे होते की, ही मशीद खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडू नये. 3 वर्षांपूर्वी हे बांधकाम केले आहे तेव्हा कुठलीही कारवाई झाली नाही मग आता निवडणुका आल्यावरच कारवाई का होते? हिंदू-मुस्लीम नाही, तर एकतेचे राज्य चालेल. आम्ही सगळे एक आहोत.
शेकडो जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले. यावेळी मशिदीचे ट्रस्टी आणि वर्षा गायकवाड यांची पोलिसांसोबत बैठक झाली. या बैठकीत धारावीमधील पालिकेची करण्यात आलेली कारवाई तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला. आता 6 ते 8 दिवस पालिकेची कारवाई होणार नाही, असे सांगण्यात आले.
स्थानिक काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी कालच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी सुभानिया मशिदीचा अवैध भाग पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या पत्राला उत्तर मिळण्यापूर्वीच पालिकेही कारवाई केली. यामुळेही संताप व्यक्त केला जात आहे. खा. वर्षा गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली की,मी इथे आहे, पोलीस इथे आहेत. त्यामुळे इतका विश्वास ठेवा आणि घरी जा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुमची मदत होणे गरजेचे आहे.
त्यानंतर पोलिस अधिकार्यांनी लोकांना समजावून वाहतूक सुरळीत करण्याची विनंती केली. लोकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आणि दगडफेक न करण्याचे आवाहन केले. मात्र यानंतरही धारावीत आंदोलनकर्त्यांचा गोंधळ सुरू होता. आम्हाला ही कारवाई मान्य नाही, ही कारवाई रद्द करावी, असे आंदोलनकर्त्याचे म्हणणे होते.
या घटनेचे राजकीय पडसादही उमटले. भाजपा आ. नितेश राणे म्हणाले की, या जिहादी मानसिकतेच्या लोकांना देशात, महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्यानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर महापालिका जेव्हा अतिक्रमण तोडायला आली तेव्हा तिथल्या जिहादींनी अतिक्रमण तोडायला दिले नाही. उलट मुंबई महापालिकेची वाहने फोडली. ही अरेरावी आणि दादागिरी आहे, त्यांनी पाकिस्तानात आणि बांगलादेशात जाऊन दाखवावी. हा देश संविधानाप्रमाणेच चालणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्रात सारख्या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. रोज हिट अँड रन, ड्र्ग्स, कोयता गँगच्या बातम्या दिसतात. आणि आता धारावीत तणावपूर्ण वातावरण. हे सातत्याने का होत आहे? भाजपा सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर या राज्यात कसे येतात? याचाही अभ्यास केला पाहिजे. तर या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे . जर अनधिकृत बांधकाम असेल तर प्रशासन निर्णय घेईल,असे मंत्री उदय सामंत म्हणाले.