अजित पवारांचा लोकसभेला फायदा झाला नाही संघाच्या बैठकीत फडणवीसांची कबुली

नागपूर- महायुतीत अजित पवार यांना का घेतले? असे भाजपा नेते खासगीत विचारतात. आता संघाने देवेंद्र फडणवीस यांना हाच सवाल करीत म्हटले की, तुम्ही आमच्या पदाधिकार्‍यांना डावलले आणि अजित पवारांना सोबत का घेतले? या प्रश्‍नाला उत्तर देताना चूक झाली अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी संघाबरोबरच्या बैठकीत दिली.
काल दिवसभर नागपुरात चाललेल्या संघाच्या बैठकीत भाजपाच्या वतीने देवेंद्र फडणवीस अखेरच्या सत्रात सहभागी झाले. त्यांनी या बैठकीत भाजपाच्या वतीने संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमोर विस्तृतपणे भाजपाची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती मांडली. आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना का सोबत घ्यावे लागले, याची राजकीय कारणे सांगताना फडणवीस म्हणाले की, 2019 मध्ये भाजपा आणि शिवसेना वेगळे झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. तेव्हा भाजपा सर्वात मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपाच्या मतांची टक्केवारी भाजपाला स्वबळावर सत्तेत बसवू शकेल इतकी नव्हती. म्हणून आधी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आले. त्यानंतरही दोन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखे यश मिळवून देईल इतकी नसल्याने अजित पवार यांनाही सोबत घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाची 89 टक्के मते एकनाथ शिंदे यांना मिळाली तर शिंदेंचीही 88 टक्के मते भाजपाकडे वळली. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्याचा फारसा फायदा भाजपाला लोकसभा निवडणुकीत झाला नाही. तरीही त्यांना राजकीय कारणांसाठी पक्षात घेतले असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचे भाजपाचे ठरले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली. 2019 ते 2022 दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना कामाचे जे सातत्य तुटले होते ते पुन्हा सुरू करता आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपामधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचे अवलोकन केले. त्यातही विधानसभा निवडणुकीत अजितदादा यांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावे, असे ठरले असेही फडणवीस म्हणाले.
काही दिवसांपूर्वी संघांच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रातून अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका करण्यात आली होती. तर अजित पवार यांच्या पक्षाची युती भाजपा कार्यकर्त्याला आवडली नाही. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत बसला, असे संघाचे आणखी एक मुखपत्र ‘विवेक’ साप्ताहिकाने स्पष्टपणे म्हटले होते. त्यानंतर घडलेल्या काही घटनांवरूनही अजित पवार भाजपाला नकोसे झालेत का, असा प्रश्न विचारला जात होता. आता फडणवीस यांनीही संघाच्या सुरात सूर मिसळला आहे. किंबहुना अजित पवार यांच्यावर दबाव आणून त्यांना विधानसभा निवडणुकीवेळी कमी जागा मान्य करण्यास मजबूर करायचे हा भाजपा व संघाचा यामागचा डाव असू शकतो.
संघ बैठकीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही हे स्वतः ऐकले आहे का? बर्‍याचदा आम्ही काही बोलत नाही तरी आमच्या तोंडी घातले जात आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही लपवाछपवी करत नाही. असल्या गोष्टी माझ्याकडून होत नाहीत. लोकसभा निवडणुकीत मोदी पवारांना भटकंती आत्मा बोलले, त्याचा फटका आम्हाला बसला. पण झाले गेले गंगेला मिळाले. आता नव्या उमेदीने उतरणार आहोत. विकासावरच बोलणार आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top