अजित पवारांचा राज ठाकरे होणार! पवारांना मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे

पुणे- अजित पवार हे राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत. त्यांना पक्षात वारंवार डावलले जात असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. अजित पवार यांचा पुढे राज ठाकरे होणार आहे. त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध आहे. त्यांचा काटा काढला जात आहे. राज ठाकरे यांच्याबरोबर जे महाबळेश्वरमध्ये झाले तेच आज अजित पवारांसोबत होत आहे. त्यांना कुटुंबाकडूनच बाहेर ढकलून दिले जात आहे. राष्ट्रवादी हा पक्ष सुप्रिया सुळेंच्या हातात द्यायचा, असा दावा शिवतारे यांनी केला आहे.
विजय शिवतारे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू आहे. अजित पवार यांचे रोखठोक, परखड बोलणे असले तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जात आहे. स्वतः त्यांच्या घरातून त्यांना विरोध आहे. जे शिवसेनेत घडले होते तेच अजित पवार यांच्यासोबत घडत आहे. राज ठाकरेंची ताकद चांगली होती. मात्र त्यांना डावलून महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्यात आले होते. तसेच अजित पवारांसोबत सुरू आहे. अजित पवारांना पक्षाबाहेर ढकलण्याचे काम सुरू आहे. शरद पवार म्हणाले होते, माझ्या पक्षातून कोणी जात असेल तर जाऊ दे. दुसऱ्या दिवशी ‘सामना’त रोखठोक सदरात याबाबत छापून आले. अजित पवारांना बदनाम करून पक्षातून बाहेर ढकलण्यात येत आहे. म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था त्यांची होईल. शरद पवारांना आपल्या मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे. त्यासाठी अजित पवार स्वतः बाहेर पडतील अशी स्थिती निर्माण केली जात आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यानंतर पवारांच्या घरात ही भाऊबंदकी दिसून येणार का? हे येत्या काळात राज्याला समजेल. सुप्रिया सुळे अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या मोठ्या भावाचे म्हणजे अजित पवारांचे कौतुक करतात. मात्र जेव्हा प्रश्न सत्तेचा येतो तेव्हा नातेसंबंधांना बाजूला सारले जाते हे अनेक वेळा महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित पवारांना वारंवार डावलले गेले तर ते स्वतःच राष्ट्रवादीतून जातील आणि सुळे यांचा मार्ग सोप्पा होईल, अशी चर्चा आहे. शिवतारे यांच्या या विधानामुळे या चर्चांना हवा
मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार हे नाव सातत्याने चर्चेत आहे. पहाटेच्या शपथविधीनंतरही त्यांच्या नावाची इतकी चर्चा झाली नव्हती जितकी चर्चा मागील 10 दिवसांपासून सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटनंतर अजित पवार जे चर्चेत आले त्या चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत. उलट रोज अजित पवार यांच्या संदर्भातील बातम्या येत असतात. शिवतारे यांनी केलेला दावा धक्कादायक आहे. त्यांनी केलेल्या दाव्याची राज्यात कुजबूज सुरू आहे. अजित पवार यांनी या अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आगीशिवाय धूर येत नसतो. गुरुवारी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचे आकर्षण नाही.
मुख्यमंत्रिपदाचा दावा ठेवण्याची आताही तयारी आहे. हे विधान करून ते वारंवार आपल्या मनातली खदखद बोलून दाखवत आहेत.
विजय शिवतारे यांच्यावर पवारांची टीका
विजय शिवतारेंच्या वक्तव्याआधी अजित पवार मुलाखतीत म्हणाले होते की, विजय शिवतारे हे माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचे दैवत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते. पवारसाहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील काम पाहून त्यांच्यावर टीका होणे, मला योग्य वाटत नाही. कुणाला मस्ती आली तर ती जिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा इशारा अजित पवार यांनी पुन्हा दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top