मुंबई- शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी आले होते. उद्या अजय चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चौधरींनी सुधीर साळवींची भेट घेतली. दोघांनी चर्चा केली. चौधरी यांनीच या भेटीचे फोटो त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत.
ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना संधी दिल्यानंतर इच्छुक असलेले शिवडी विधानसभा संघटक व लालबाग राजा मंडळांचे विश्वस्त सुधीर साळवी हे नाराज झाल्याची चर्चा सुरु होती. त्यांच्या समर्थकांनीही सुधीर साळवी यांनाच उमेदवारी मिळायला हवी अशी भूमिका घेतली होती. मात्र सुधीर साळवी यांना मातोश्रीवर बोलवून घेण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर आज अजय चौधरींनी सुधीर साळवी यांची भेट घेतली आणि सुधीर साळवी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला .