मुंबई – अखेर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन काल बुधवारी मुंबईत धावली.काल या एक्स्प्रेसच्या प्रोटोटाइप रेकची अहमदाबाद ते मुंबई सेंट्रलदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी प्रति तास १३० किलोमीटर वेगाने पार पडली आहे.अंतिम विश्लेषणानंतर रेल्वेच्या संशोधन डिझाइन व मानक संघटना म्हणजेच आरडीएसओकडून मंजुरी मिळाल्यानंतर ती प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होईल.
भारतीय रेल्वे सध्या प्रवाशांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे.या ट्रेनमुळे प्रवास अधिक सुखद आणि गारेगार होणार आहे. बुधवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल येथे आली. ट्रेनच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टीम, एअर सस्पेन्शन, वळणांवरील स्थिरता आणि कप्लर फोर्सची चाचणी घेण्यात आली आहे. ही ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावते. जानेवारी अखेरीस ही ट्रेन प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ही ट्रेन कोणत्या मार्गावर चाळवली जाणार हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र पहिली ‘ वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली ते मुंबई किंवा दिल्ली ते कोलकाता या शहरांदरम्यान चाळवली जाऊ शकते.
१६ डब्यांच्या या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमध्ये ११ एसी-३ टियर, ४ एसी-२ टियर आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.तसेच सर्व डबे अग्निसुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत.स्वतंत्र चार्जिंग पोर्टस् आणि फोल्डेबल स्नॅक टेबल असणार आहे.शिवाय दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल नेव्हिगेशनची सोय करण्यात आलेली आहे.तसेच या ट्रेनचे तिकीटदर राजधानी व तेजस ट्रेनच्या तुलनेत १० ते १५ टक्के अधिक असतील. स्लीपर कोचमुळे रात्रभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी अनुभव मिळेल,अशी अपेक्षा आहे. याशिवाय ब्रेल नेव्हिगेशन व इतर सोयीसुविधांमुळे दिव्यांग प्रवाशांसाठीही हा प्रवास सोयीस्कर ठरणार आहे.