बारामती – आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बारामतीकरांना अभुतपूर्व असे धर्मयुद्ध पाहायला मिळाले. बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना ठाऊक आहे. मात्र आज दोन पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि एकमेकांना विक्रमी मताधिक्क्याने पाडा, असे आवाहन केले. अजित पवारांनी त्यांच्या आईला सभास्थानी उतरविले. तर शरद पवारांनी योगेंद्र पवार या पुढच्या पिढीला निवडून आणा, असे आवाहन केले.
बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी आज बारामतीत अखेरच्या काही तासांत सांगता सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेला ताई आणि विधानसभेला मी असे म्हणायचा. तर आता मला पाठिंबा द्या. जितक्या मताधिक्क्याने मला विधानसभेत पाठवाल तितका जास्त निधी बारामतीला आणीन. ही गावकी भावकीची निवडणूक नाही. राज्याचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. राज्यात बारामती हा एक नंबरचा तालुका आहे. मला विजयी केले तर पुढील पाच वर्षांत मला बारामती हा देशात एक नंबरचा तालुका करायचा आहे.
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, बारामतीकरांनी प्रचंड बहुमताने मला विधानसभेत पाठवले. इतरांची डिपॉझिट जप्त केली तेव्हाच ठरविले की, बारामतीकरांना राज्यात सर्वाधिक निधी प्राप्त करून द्यायचा हे मी ठरवले होते. 9 हजार कोटी रुपये ग्रामीण भागाला, माळेवाडी, काटेवाडी या सर्व भागात दिला, महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपण बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही हे मी ठरवले आणि त्याप्रमाणे करीत आलो. सर्व घटकांपर्यंत पोहोचलो. जिरायत शब्द इथून जावा हा प्रयत्न केला. हा भाग सुरक्षित आहे, अल्पसंख्याक असला तरी भीती नाही, इथे निवृत्त होऊन राहावे असे लक्ष्य ठेवले. बारामतीकरांनो, आता माझ्यावर पक्षाची जबाबदारी आहे. महायुतीचा आम्ही घटकपक्ष आहे. मुलींना शिक्षण मोफत, शेतकर्यांना मदत, लाडकी बहीण, सौर ऊर्जा या योजना आणताना निधीची व्यवस्थित सोय केली. 1991 साली साहेबांनी माझ्यावर बारामतीची जबाबदारी दिली ती मी पार पाडतो आहे.
पंतप्रधानांनी 3 कोटी घरांचा कार्यक्रम दिला. त्यातील पुणे, बारामतीला किती घरे आणायची ते बघायचे आहे. पुढील योजना तयार आहेत. आचारसंहिता संपली की निविदा निघतील. लोकसभेला सुप्रिया ताई, विधानसभेला मी असे म्हणायचा तर आता मला, जितक्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठवाल तेवढा जास्त निधी
बारामतीला आणेन.
मी एकटा पडलो होतो. पण माझी आई, माझी बहीण, माझी मुले सोबत आहेत. पत्नी पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली. ती माझ्याबरोबर आहेच. काही म्हणता दोन त्यांना, दोन यांना देऊ, तसे करू नका सर्व चारही मते मला द्या. 1990 पर्यंत शरद पवार इथे बघायचे त्यांना सर्वांनी साथ दिली. मग मी आलो. ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. ही राज्याचे भवितव्य ठरविणारी आहे. तुमच्यामुळे मी राज्याच्या दहा महत्त्वाच्या नेत्यांच्या यादीत आहे. हे मिळवायला काही वर्ष त्यासाठी मेहनत करावी लागते, व्हिजन असावी लागते. प्रशासनावर पकड असावी लागते.
अजित पवारांच्या आईचे पत्र अजित पवारांच्या आई आशा पवार यांचे पत्र आज व्यासपीठावरून वाचून दाखविण्यात आले. या पत्रात आईने म्हटले आहे की, एक आई म्हणून अजितच्या बाबतीत सांगते की, तो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतो. तो कुटुंबासाठी सर्व सोसतो आहे. त्याच्यावर काय अन्याय झाला हे त्यालाच माहीत आहे. पण तो गप्प आहे.
शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बारामती मतदारसंघाचे मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी लेंडीपट्टी मैदानावर सांगता सभा पार पडली. या सभेसाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यासह कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी बारामतीकरांना असे आवाहन केले की, अजित पवारांना तीन वेळा उपमुख्यमंत्री केले. त्यांनी चांगले काम केले. याबद्दल माझी काही तक्रार नाही. परंतु आता पुढे युगेंद्र यांची नवी पिढी असणार आहे. त्याला संधी द्या.
शरद पवार म्हणाले की, यंदा आम्ही तरुण पिढीच्या हातात सत्ता देण्याचे ठरवले. त्यासाठी युगेंद्रची निवड केली आहे. त्याची लोकांसाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे. काही लोक (अजित पवार) नेहमी म्हणतात, मी काय करू? मग त्याला मी तरी काय करू? 1967 साली मी आमदार झालो. 20 वर्षे मी आमदार, मुख्यमंत्री अशी पदे भूषवली. त्यानंतर नवी पिढी आणावी, असा विचार केला आणि अजित पवारांना आणले. 30-35 वर्षे त्यांनी बघितले. त्यांना 3 वेळा उपमुख्यमंत्री केले. आता पुढे युगेंद्र यांची नवी पिढी राहणार आहे. त्याला संधी द्यावी. बारामतीचा नावलौकिक आज देशभरात आहे. ही परंपरा पुढे कायम राहावी, यासाठी मतांचा विक्रम करा. बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही 50 वर्षे काम केले. त्याहीपेक्षा अधिक जोमाने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी युगेंद्रमध्ये आहे. ते पुढे म्हणाले की, तुम्ही लोकांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला शक्ती दिली. सुप्रियाला मोठ्या मताने विजयी केले. महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 30 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले. आता विधानसभेची निवडणूक होत असून त्यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणीचा सन्मान करायचा असेल तर काही अडचण नाही. पण एका बाजुला लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसर्या बाजूला तिची सुरक्षा करायची नाही. आज महायुतीच्या काळात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले. याला काय अर्थ आहे? महाराष्ट्रातील महिला आणि तरुणी बेपत्ता होत आहेत. जे लाडकी बहीण म्हणतात, त्यांनी 64 हजार बहिणी कुठे गेल्या, त्यांचे किती रक्षण केले, त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली हे यांनी सांगावे. पण ते सांगण्याची धमक
सत्ताधार्यांमध्ये नाही.
जिकडे म्हातारा फिरतो
तिकडे चांगभलं होतं
शरद पवारांच्या सभेला त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी कुणीतरी त्यांच्या हातात ’जिकडे म्हातारा फिरतो तिकडे चांगभलं होतं’, असा लिहिलेला बॅनर आणून दिला. त्यांनीही तो उंचावून दाखवला.