अंबानी घराबाहेर बॉम्ब आणि मनसुख हत्येपासून वादग्रस्त ठरलेले परमबीर सिंग निर्दोष! पगारही देणार

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप शिंदे सरकारने आज अखेर मागे घेतले. परमबीर सिंह यांना निर्दोष तर ठरवलेच, पण त्यांना निलंबन कालावधीतील पगारही दिला जाणार आहे. त्यांना निलंबनाच्या काळात ऑन ड्युटीवरच असल्याचे समजावे, असे या आदेशात सरकारने म्हटले. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाजवळ स्फोटक सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणापासून परमबीर सिंह वादात अडकले होते. त्यातच अनिल देशमुखांनी दर महिना 100 कोटी गोळा करण्यास सांगितले असे स्फोटक पत्र त्यांनी लिहिले होते. मात्र आता या आदेशामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा तर महाविकास आघाडीसह अनिल देशमुखांना तगडा झटका बसला आहे.
19 फेबु्रवारी 2020 रोजी परमबीर सिंहांची मुंबईच्या पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. मात्र मुकेश अंबानींच्या अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणी आरोपी सचिन वाझेची चौकशी करताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचल्याच्या आरोपानंतर 18 मार्च 2021 ठाकरे सरकारने सिंहांना पोलीस आयुक्तपदावरून हटवले आणि त्यांची गृहरक्षक विभागात बदली करण्यात आली. त्यामुळे परमबीर सिंह चांगलेच खवळले आणि 20 मार्च 2021 रोजी त्यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र लिहिले. या पत्रात सिंह म्हणाले की, ‘देशमुख हे गुन्हे शाखेचे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंना ज्ञानेश्‍वरी बंगल्यावर बोलावून मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगायचे. प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख गोळा करा, असे देखील देशमुख वाझेंना सांगत होते. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली. या आरोपांना प्रत्युत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, ‘अंबानींच्या अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील चौकशीत परमबीर सिंहांचे नाव येत असल्यामुळे माझ्यावर सिंह आरोप करत आहेत. सिंह यांनी वकीलामार्फत त्यांच्या तक्रारीसह मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र हे प्रकरण चिघळल्याने अखेर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांना नंतर अटक झाली. त्याआधी त्यांचे पीए कुंदन शिंदे व संजिव पालांडेंना अटक झाली.
मात्र त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर अनेक आरोपांचा सपाटा लागला. 28 एप्रिल 2021 रोजी अकोल्यातील निरीक्षक बी. आर. घाडगेंनी लेटरबॉम्ब टाकत सिंह हे बदल्यांसाठी 1 कोटी रुपये द्यायचे, असा आरोप केला. घाडगेंच्या तक्रारीवरून सिंहांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 5 मे 2021 रोजी प्रकृतीचे कारण देत परमबीर सिंह रजेवर गेले. ते मूळगावी चंदीगडला गेले होते. माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले.
21 जुलै 2021 रोजी भाईंदर येथील विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांनी माझ्याकडे परमबीर सिंह आणि काही पोलीस अधिकार्‍यांनी 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला. अग्रवालांच्या तक्रारीवरून 23 जुलै 2021 रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याने सिंह आणि इतर चार आरोपींविरुद्ध अपहरण, खंडणी, फसवणूक केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल केला. 30 जुलै रोजी व्यापारी केतन तन्ना यांच्या तक्रारीच्या आधारे ठाण्याच्या नगर पोलीस ठाण्यात सिंहांविरोधात चौथा गुन्हा दाखल झाला. 20 ऑगस्ट 2021 रोजी हॉटेल व्यावसायिक आणि नागरी कंत्राटदार बिमल अग्रवाल यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे परमबीर सिंह, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर तिघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल केला. तोपर्यंत परमबीर सिंह गायब झाले. ते कुठे आहेत याचा शोध सुरू झाला. परमबीर सिंह बेल्जियममध्ये असल्याची चर्चा होती.
17 नोव्हेंबर 2021 रोजी सिंह यांना फरार घोषित करण्यात आले. त्यानंतर वाळकेश्वर आणि जुहू येथील त्यांच्या घराबाहेर नोटीस लावण्यात आली. 22 नोव्हेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि सीबीआय यांना नोटीस जारी करून 6 डिसेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. दोन दिवसांनंतर परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले. गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. 29 नोव्हेंबर 2021 रोजी परमबीर सिंह निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. यावेळी आयोगाने सिंह यांच्याविरोधात जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले आणि त्यांच्यावर 15 हजार रुपये दंड ठोठावला. पण यावेळी सचिन वाझे यांची परमबीर सिंह भेट
चर्चेचा विषय ठरली. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते. 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील कोपरी प्रकरणात सीआयडीकडून सिंहांची सलग दोन दिवस चौकशी झाली. 2 डिसेंबर 2021 रोजी परमबीर सिंहांना निलंबित करण्यात आले. सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार बनण्याचा अर्ज त्याच काळात मान्य करण्यात आले. अंबानी घराबाहेर बॉम्ब आणि मनसुख हत्येपासून वादग्रस्त ठरलेले परमबीर सिंह यांना शिंदे सरकारने अखेर निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्याबाबत सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी आदेश जारी केला. त्यात भट म्हणाले की, अखिल भारतीय सेवा, नियम 1958 च्या तरतुदीनुसार परमबीर सिंह (निवृत्त) यांचे निलंबन या आदेशाद्वारे रद्द करण्यात आले आहे आणि 2 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी कालावधी मानला जाईल. निलंबनाच्या काळात परमबीर सिंह सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे निलंबन मागे घेतलं असलं तरी ते सेवेत पुन्हा रुजू होऊ
शकत नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top