मुंबई
मुंबईच्या अंधेरी येथील शहाजी राजे संकुलात शूटिंग, लग्नसमारंभ होत असल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याअंतर्गत पालिका आयुक्त ९ मे रोजी या ठिकाणची पाहणी करणार आहेत. या संकुलात क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी असे मैदानी खेळ खेळले जात होते. मात्र, आता फक्त फुटबॉल खेळ खेळला जातो. फुटबॉलसाठी इतर खेळ जाणूनबुजून बंद करण्यात आले आहेत, असे म्हटले जाते.
या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या खेळाडूंकरिता राहण्यासाठी ५६ खोल्यांचे खेळाडू वसतिगृह बनवण्यात आले होते. आता त्याचे थ्री स्टार हॉटेल बनवण्यात आले असून, येथे ऑनलाइन बुकिंग व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई मनपाने भाडेपट्टे करारावर दिलेल्या ललित कला प्रतिष्ठानने शहाजीराजे क्रीडा संकुलाचे हॉटेलमध्ये, लग्न सभागृहामध्ये रूपांतर केल्याची तक्रार भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल हे या संकुलाची पाहणी करणार आहेत.