वॉशिंग्टन- आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले सात महिने अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स प्रदीर्घ काळ अवकाशात राहिल्यामुळे चालणेही विसरून गेल्या आहेत. त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सुनिता विल्यम्स यांच्याबद्दल चिंता वाटते आहे. त्यांनी विल्यम्सला लवकरात लवकर पृथ्वीवर परत आणण्यास मदत करण्याची विनंती स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांना केली आहे.
ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करून आपण मस्क यांना विनंती केल्याची माहिती दिली. बायडन प्रशासनाने सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांना अंतराळात सोडून दिले हे भयंकर आहे. त्यांना लवकरात लवकर पृथ्वीवर घेऊन या, असे ट्रम्प पोस्टमध्ये म्हणाले.
नीडहॅम हायस्कुलच्या विद्यार्थ्यांशी अवकाश तळावरून संवाद साधताना सुक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रदीर्घ काळ राहावे लागल्याने येत असलेल्या अडचणी सुनिता विल्यम्सने सांगितल्या. ‘अवकाश तळामध्ये सुक्ष्म गुरुत्वाकर्षण असल्याने येथे पृथ्वीवर जसे आपण चालतो, बसतो तसे चालता-बसता येत नाही. येथे आम्ही नेहमी हवेत तरंगत असतो. अशा परिस्थितीत मला एखाद महिना राहावे लागेल असे सुरुवातीला वाटले होते. परंतु माझा मुक्काम एवढा लांबला याचे आश्चर्य वाटते. आता मी चालायचे कसे हेच विसरून गेले आहे’, असे सुनिता विल्यम्स यांनी सांगितले. त्यामुळे जगभरातील खगोलप्रेमींची चिंता वाढली आहे.
याआधी सुनिता विल्यम्सने तिचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात ती अत्यंत कृश दिसली. त्यामुळे तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली. त्यावर तिने खुलासा केला की माझे वजन घटलेले नाही. माझी प्रकृती चांगली आहे. काळजी करू नये.
अंतराळवीर सुनिता विल्यम्सला चालताही येईना! चिंता वाढली
