अंटार्टिकावरील वितळणाऱ्या बर्फाचा नासा रोबोटद्वारे अभ्यास करणार

वॉशिंग्टन – अंटार्टिकावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा करणार आहे.त्यासाठी नासाच्या रॉकेट विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे पथक यंत्रमानवाच्या साह्याने अंटार्टिकात संशोधन करणार आहे.अंटार्टिकावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढल्याने समुद्रातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक हवामान बदलामुळे हे घडत आहे. अंटार्टिकावर लाखो वर्षांपासून मोठ मोठे हिमखंड आहेत. या हिमखंडांमध्ये अशा काही जागा आहेत की जिथे पोहोचणे मानवाला शक्य नाही.आजवर एकही शास्त्रज्ञ जिथे पोहोचू शकलेला नाही अशा ठिकाणी नासा यंत्रमानव पाठवून त्यांच्या माध्यमातून संशोधन करणार आहे. आईसनोडस असे या यंत्रमानवाचे नाव आहे. बर्फ वितळण्यामागील नेमकी कारणे काय आहेत,याचा शोध हे आईसनोडस घेणार आहेत.या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत दहा आईसनोडस समुद्रात उतरविण्याची नासाची योजना आहे. हे आईसनोडस पाण्याच्या प्रवाहाबरोबर खास सॉफ्टवेअरच्या मदतीने हिमखंडांखाली असलेल्या दुर्गम पोकळीपर्यंत पोहोचतील,अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top