नाशिक – बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला चालना मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्याचबरोबर तीन महिन्यांत प्रत्यक्षात काम सुरू होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे.
त्र्यंबकेश्वर शहराजवळील अंजनेरी ते ब्रह्मगिरी यांना दोन पर्वतांना जोडणाऱ्या रोपवेला मंजुरी मिळाली. या प्रकल्पामुळे या दोन्हीही तीर्थक्षेत्रावरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी विश्वास व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी ५.८ किलोमीटर अंतर रोप-वेने जोडले जाणार आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ही केंद्र सरकारची कंपनीने हे काम हाती घेतले असून २०२७ च्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रकाश गौर यांच्यासह प्रतिनिधी यांनी यापूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट देत पाहणी केली होती. हा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक मोनोकेबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दोन टेकडीच्या मध्ये मध्यवर्ती स्टेशन असेल. प्रकल्पासाठी ३० हून अधिक टॉवर बांधले जातील. रोप-वेची वाहून नेण्याची क्षमता प्रतितास किमान १५०० प्रवासी असेल. त्र्यंबकेश्वरमध्ये रोप-वे स्टेशन उभारले जाऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र, या रोप-वेला स्थानिक गावकरी आणि पर्यावरणप्रेमींचादेखील विरोध होता. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकल्पाला पुन्हा चालना मिळाल्याचे चित्र आहे.