अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार

मुंबई

अंगणवाडी कर्मचार्यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मानधनात वाढ व इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. त्यासोबतच नोव्हेंबर २०२३ या महिन्याचा मासिक अहवाल, मासिक बैठका व इतर माहिती देण्यावर कार्यक्रमांवर अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण बहिष्कार घालणार आहेत. यासंदर्भात कायदेशीर नोटीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे, अशी माहिती कृती समितीच्या पदाधिकारी कमलताई परुळेकर यांनी दिली.

२५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजाणी करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक पदे असुन त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे. तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषीत करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा, इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २६,००० रुपये व मदतनिसांना २०,००० रुपये दरमहा मानधन देण्यात यावे. महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी. महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवासमाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यासाठी ५००० ते ८००० रुपये भाडे मंजूर करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याची माहीती परुळकेर यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top